दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरून नेत्याचे खासदार सुळेंना पत्र (Photo Credit- Social Media)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे. एकूणच या दोन्ही पक्षांनी एकत्रित यावे, अशी भूमिका त्यांची असल्याचे स्पष्ट होत आहे. तर पक्षाने कोणताही निर्णय घेतला तरी मी शरद पवार यांच्यासोबतच राहील, असे काकडे यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पा मारताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या एकत्रिकरणाविषयी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार सुळे यांना पत्र लिहिले. या पत्रातील तपशीलाविषयी त्यांनी अधिक माहिती सांगण्यास टाळले. मात्र, त्यांच्या बोलण्यातून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका या पत्रात मांडल्याचे स्पष्ट होत आहे.
या पत्राविषयी काकडे म्हणाले, ‘दोन्ही पक्ष एकत्रित येण्यासंदर्भात सध्या माध्यमात चर्चा सुरु आहे. कार्यकर्ता यामुळे संभ्रमावस्थेत असून, पक्षाची सद्यस्थिती काय, कार्यकर्त्यांचे मनोगत काय हे सांगण्याचे कर्तव्य मी पार पाडले आहे. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना पत्र दिले आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. पुणे जिल्ह्याचा पक्षाचा निरीक्षक म्हणून आजपर्यंत काम पाहिले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडली आहे.
पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हाेणार असल्याने, मी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी पत्रात लिहिले आहे. 14 मे राेजी प्रदेश कार्यकारणीची बैठक आहे, त्याला मी जाणार आहे. तेथे माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चर्चा झाली. 2008 पासून ते विभक्त आहे, ते पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरु आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे तर अडीच वर्षापूर्वीच विभक्त झाले.