prepare for BMC elections 2025
Raj Thackeray Marathi News : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व पालिका आणि पंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्ये मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेसह मनसे पक्ष देखील तयारीला लागला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. मुंबईतील रंगशारदा या ठिकाणी हा पदाधिकारी मेळावा पार पडला आहे. या मेळाव्याला मुंबईतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मराठी भाषेचा मुद्दा प्रत्येक घराघरात पोहोचवा, पण हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका. आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा, असा महत्त्वाचा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. त्याचबरोबर निवडणुकांबाबत देखील निर्देश दिले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईतील आपल्या वॉर्डमध्ये मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा. स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा, तसेच ग्राउंडवर उतरून काम करण्याचे निर्देश राज ठाकरेंनी केले आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता, पूर्ण आत्मविश्वासाने काम करा. पक्षामध्ये अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीला थारा देऊ नका. ज्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील, त्यांना स्वीकारून एकत्र काम करा. आपापसातले हेवेदावे संपवून निवडणुकीच्या कामाला लागा,” असे महत्त्वपूर्ण आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
माझ्या आदेशाची वाट पहा – राज
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची देखील चर्चा सुरु आहे. दोन्ही नेत्यांमधील जवळीक दिवसेंदिवस वाढत असून वाद निवळण्याच शक्यता आहे. मराठी भाषेचा मुद्दा हाती घेत दोन्ही नेते युती करण्याची शक्यता आहे. याबाबत पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्यवेळी बोलेन, माझ्या आदेशाची वाट पाहा” असे सूचक वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे एकत्रित आले. मराठी भाषेसाठी त्यांनी एकत्रितपणे विजयी सभा देखील घेतली. यामुळे तब्बल दोन दशकांनंतर राज-उद्धव हे एकत्र दिसून आले. राज-उद्धव एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. याचा फायदा दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्याची शक्यता आहे. मुंबईवर वर्चस्व कायम राखण्यासाठी आणि भाजप व शिंदे गटाला धक्का देण्यासाठी दोन्ही नेते एकत्रित येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने मातोश्रीवर देखील दाखल झाले होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.