mns raj Thackeray letter on Hindi Language mandatory in maharashtra school
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी अनेकदा आवाज उठवला आहे. दोन महिन्यांपूर्वी शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली होती. या विरोधात मनसे पक्ष आणि राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे संपूर्ण राज्यभरातून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यात आला. यानंतर आता मात्र पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी राज्यातील शालेय शिक्षण विभागावर संशय व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी मनसैनिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी पत्र लिहित मनसैनिकांना आवाहन केले आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रति,
मा.श्री.दादा भुसे
शालेय शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात… pic.twitter.com/AFXzoPSqOs — Raj Thackeray (@RajThackeray) June 4, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरु झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना ? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता. ( मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात , आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यां सारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार ? ) त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा. त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील ( मराठी आणि इंग्रजी ) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा,”अशी मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे.