करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणाचे केले कौतुक (फोटो - सोशल मीडिया)
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अजित पवार गटाचे नेते व बीडचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसोबत असणाऱ्या संबंधांमुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी जोरदार निशाणा साधला. करुणा मुंडे यांनी आता पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांचे कौतुक केले आहे. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे यांनी सध्या अध्यात्मिक मार्ग निवडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी इगतपुरी येथील ध्यानकेंद्राला भेट दिली होती. यानंतर आता ते नाशिकला गेले आहेत. नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंडावर धनंजय मुंडे काही धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले. आता यावर करुणा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे बाजीरावसारखे अजय योद्धे आहेत, असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मात्र आता यावरुन नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या करुणा मुंडे?
करुणा मुंडे यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना बाजीरावांची उपमा दिली. त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडेंचे पद गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काहीही काम नाही. ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे काही लोक अशी बातमी पसरवत आहे की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण ते होणार नाही. हे सर्वांना माहिती आहे,” असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “प्रत्येक राजकीय व्यक्ती स्ट्रॅटर्जी प्लॅनर ठेवतो. अगोदर पंकजा ताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. पाच वर्षे त्यांच्याकडे काही काम नव्हतं. त्यांनी शिवशक्ती यात्रा काढली. यानंतर त्यांचा ग्राफ वाढत गेला आणि आज त्या मंत्री झाल्या. त्याप्रमाणेच स्ट्रॅटर्जी प्लॅनर असतो. प्रत्येकाची सेम स्ट्रॅटर्जी असते. जे नेगिटिव्ही सुरु आहे, त्यानुसार पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर बातम्या तशाच येतात, असेही करुणा शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे अॅक्टिव्ह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे बाजीरावसारखा अजय योद्धा आहे,” अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंचे कौतुक केले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकारणातील महत्त्व एका अर्थी त्यांनी अधोरेखित केले आहे.