mns Raj Thackeray press conference on dadar Kabutar Khana
Raj Thackeary on Kabutar Khana : मुंबई : राज्यामध्ये कबूतरखाना हा वादाचा विषय ठरला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कबूतरखाना आहे. मुंबई न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई पालिकेने दादर भागातील कबूतरखाना बंद केला आहे. यावरुन मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. कबूतरखाना बंद करत ताडपत्री देखील पालिकेकडून टाकण्यात आली होती. मात्र आंदोलन करत जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली. तसेच कबुतरांना खायला घालायला सुरुवात केली. हे प्रकरण तापलेले असून यावर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेते राज ठाकरे हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली आहे. या नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले असून यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे. यामध्ये राज ठाकरेंनी शहर आराखडा आणि वाहतूक नियोजन करत असल्याचे कारण दिले आहे. याचबरोबर मुंबईतली कबूतरखाना वादावर देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर कबूतरखान्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत, अशी आक्रमक भूमिका मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतली आहे.
पुढे ते म्हणाले की, “कबूतरखाना हा राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात,” असेही राज ठाकरेंनी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईच्या विकास आराखडा आणि वाहतूक व्यवस्था, पार्किंग अशा विषयांवर मार्ग काढणारा आराखडा सादर केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, “लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग व्यवस्था जी उभी करण्याची गरज आहे. काही प्रमाणात गाडी पार्किंग उपलब्ध आहे मात्र लोकं तिथं जात नाही. लोकांना गाड्यांबाबत शिस्त लावण्याची गरज आहे. बाहेरच्या राज्यातून इथे लोक आले आहेत त्यांना माहितीच नाही इथे कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे. त्या दृष्टीकोनातून मी मुख्यमंत्र्यांकडे एक आराखडा सादर केला आहे. यावेळी वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी काही नमूने सादर करत फोटो देखील दाखवले आहे. यावेळी मैदानाच्या खाली गाड्यांचे पार्किंग करावे आणि वरच्या बाजूस मुलांना खेळायला मैदान ठेवावे,” असे देखील राज ठाकरे यांनी सुचवले आहे.