MNS Raj Thackeray Press Confernce on Election commission Voter list fraud
Raj Thackeray Press : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे.. एकीकडे निवडणुकीची मोट बांधणी सुरु असून दुसरीकडे निवडणूक आयोगाला घेरण्यात आले आहे. विरोधकांनी राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. तसेच सर्व मतदार याद्या निवडणूक आयोगाला वेबसाईटवर टाकण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात महाविकास आघाडीसह मनसे नेते राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दुसऱ्या दिवशी देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मुलीचं वय 124 तर वडीलांचं वय 43 असल्याची गंभीर बाब मनसे नेते राज ठाकरे यांनी समोर आणली आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळाने आयोगावर गंभीर आरोप करत मागण्या केल्या आहेत. याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती देखील देण्यात आली. मनसे नेते राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदार याद्यांमधील घोळ समोर आणला आहे. राज ठाकरे म्हणाले की, “मतदारसंघ 161 चारकोप मुलीचे नाव नंदिनी महेंद्र चव्हाण मुलीचं वयवर्षे 124 आणि महेंद्र श्रीनाथ चव्हाण वयवर्षे 43. मतदारसंघ 160 कादंवली पूर्व मुलीचे नाव धनश्री कदम वयवर्षे 23 आणि वडीलांचे नाव दीपक कदम वयवर्षे 117. कोणी कोणाला काढलं आहे तेच कळतं नाही. हा 2024 च्या निवडणुकीच्या आधीचा घोळ आहे,” असे म्हणत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नाव घेत मतदारयादीतील घोळ वाचून दाखवले आहेत.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “निवडणूक यादीत घोळ आहे. यादीतील घोळ राज्य आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीसमोर ठेवले. ते सुधारावेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले पाहिजे. जे निवडणूक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे. ही रास्त मागणी आहे. यात गोंधळ आणि संभ्रम असण्याचं काम नाही. 2024 विधानसभा निवडणूक झाली. 232 जागा महायुतीच्या आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या जागा आल्यावरही सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष पाहिजे तो झालाच नाही. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा एवढा हा सन्नाटा होता. ही कोणती लोकशाही आहे?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची युती ठाकरे गटापूर्ती मर्यादित न राहता महाविकास आघाडीसोबत ते येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांनी याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न केला. महाविकास आघाडीसोबत युती करणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले की, “मी 2017 साली सोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे. कुणाबरोबर होणार हा आताचा विषय नाही. 2017 लाही मी तेच बोलत होतो. अजित पवारही त्यावेळी सोबत होते. त्यांनी यायला हवं होतं. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. सांगत होते सर्व गोष्टी“ असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.