
Cabinet Reshuffle, Modi Sarkar, Shrikant Shinde, ShivSena Shinde Group,
Central Cabinet Expansion 2026: Shrikant Shinde Eyed for Education Ministry; Rejig in NDA
Modi Cabinet Reshuffle: केंद्र सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार (२८ जून) किंवा सोमवारी (२९ जून) आपल्या मंत्रिमंडळात बदल करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. सरकारने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, २३ जून रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आले आहे.
प्रस्तावित फेरबदलात केंद्रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, तसेच काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो, अशी चर्चा आहे. उत्तर प्रदेशसारख्या प्रमुख राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा होत आहे. परिणामी, भाजप आपल्या भविष्यातील राजकीय रणनीती लक्षात घेऊन जनतेला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असावा.
खास बाब म्हणजे, मंत्रिमंडळाच्या या फेरबदलात महाराष्ट्रातील शिंदे गटाला मोठी लॉटरी लागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंभी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय शिक्षण कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर प्रतापराव जाधव यांच्याकडे असलेले आरोग्य खाते काढून घेऊन ते संजय जाधव यांना दिले जाण्याची शक्यता आहे. तर प्रतापराव जाधव यांच्याकडे केवळ आयुष खात्याची जबाबदारी राहू शकते. खास बाब म्हणजे, ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थामन मिळण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संघटनात्मक अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या अटकळांना आणखी बळ मिळाले आहे. याव्यतिरिक्त, काही राज्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्यांमुळे काही नेत्यांना सरकारमधून काढून पक्षाच्या कामावर नेमले जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून (TMC) फुटून बाहेर पडलेल्या काकोली घोष, सुदीप बंदोपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नावांचा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी प्रामुख्याने विचार सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनुसार, पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांना केंद्र सरकारमधून मुक्त केले जाऊ शकते. त्यांना भाजपच्या केंद्रीय संघटनेत अधिक सक्रिय आणि महत्त्वाची भूमिका देण्याची रणनीती आखली जात असून, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनादेखील मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय देशाच्या आर्थिक धोरणांमध्येही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडील अर्थमंत्रालयाची जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. अर्थखाते काढून घेतल्यास त्यांच्याकडे देशाचे शिक्षण (मानव संसाधन विकास – HRD) मंत्रालय सोपवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.