amol kolhe on dcm ajit pawar
शिरुर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष तयारी करत आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून सभा, बैठका जोरदार सुरु आहेत. महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. गुलाबी जॅकेट आणि लाडकी बहीण योजनेचा प्रसार या प्रचाराचा धुराऴा अजित पवार यांनी उडवला आहे. यावेळी अजित पवार यांनी आपणचं साहेब असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आळंदीमध्ये एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आणि विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी दिलीप मोहिते पाटील यांना संधी मिळाली तर नक्की निवडून द्या. आळंदीला लाल दिव्याची गाडी आणायची संधी आणि स्वप्न आहे. ही जागा आपल्याकडे आल्यास, दिलीप मोहिते पुन्हा निवडून येतील. तेव्हा आपण खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देऊ. राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार. असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अमोल कोल्हेंचे सडेतोड उत्तर
अजित पवार यांच्या या साहेब वक्तव्यावरुन शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. अजित पवारांना शरद पवार गटातील नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आता शरद पवार गटाचे प्रचारप्रमुख व खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत. अमोल कोल्हे म्हणाले की, अमोल कोल्हे म्हणाले, “राज्यात फक्त दोनच साहेब आहेत. एक शरद पवार आणि दुसरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमची पिढी या दोनच नेत्यांना साहेब मानते,” असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, “केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे असा अर्थ होत नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक आणि एकूणच सामाजिक व्यासंग असावा लागतो. त्यासाठी स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळं छातीवर घेणं असेल, संकट आलं म्हणून भूमिका बदलण्यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सर्व गोष्टी करणं म्हणजे शरद पवार साहेब होणं असा अर्थ होतो. अजित पवार यांना ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने सांगायची आवश्यकता नाही” असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.