mp sanjay raut angry over shinde group leader on Vice Presidential Election 2025 cross Voting
मुंबई : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली असून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली आहेत. यामध्ये इंडिया आघाडीमधील महाराष्ट्रातील मते फुटली असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, “आम्ही राधाकृष्णन यांच अभिनंदन करतो. विरोधी पक्षाची एकजूट दिसली. जगदीप धनखड यांना मिळालेली मत 75 टक्के आणि राधाकृष्णन यांना मिळालेली मत यात प्रचंड तफावत आहे, आमच्या उमेदवाराला 300 मत मिळाली, आमची साधारण 314ची ताकद होती, विरोधी पक्ष 314, 15 मत अवैध ठरवली ती इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट आहे, पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी कोणाचे असतात तुम्हाला माहिती आहे. ही 15 मत सुदर्शन रेड्डी यांना मिळणार होती ती अवैध ठरवली. ज्याचा हातात सत्ता आहे पैसा आहे त्यांना दहा मत इकडे तिकडे करतात आली. आम्हाला अंदाज होता कोणती मतं इकडे तिकडे झाली,” असा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “300 चा आकडा काही लहान नाही. त्यांना इतर वेळा अनेक मतदान होतात. बाकीचे लोक तथस्थ राहिली. सत्तेचा गैरवापर झाला. नवीन उपराष्ट्रपती यांच्यावर जबाबदारी देणार आहे. जुन्या उपराष्ट्रपती यांचा शोध घेणे. इतके दिवस त्यांना डांबून ठेवल होते. आपल्या पूर्व उपराष्ट्रपती चे काय झाले हे राज्यसभेला कळले पाहिजे. काही मतांच्या संदर्भात संशय होता. इतका मोठा देश आहे. प्रत्येकाला माहिती असते. कोणी कोणाला बोलावले,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचा दावा केल्यामुळे संजय राऊत यांचा पारा चढला. ते म्हणाले की, “अशा लोकांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांना मेंदू नाही. हे बोलत आहे ते स्वतः विकले गेले. स्वतः गुलामी पत्करतात. त्यांना सांगायला पाहिजे शहाणपणा करू नका नाहीतर नेपाळ मध्ये झाले ते तुमच्या बाबतीत होईल,” अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.