mp sanjay raut target dcm ajit pawar over cm post of maharashtra
मुंबई : महायुतीमध्ये सध्या नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचे देखील म्हटले जाते आहे. दोन्ही नेते एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे देखील टाळत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी वाढल्या आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसेच अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार हा शरद पवार यांचा विषय आहे. पवार साहेब आणि ते भेटतात, त्यांचे काही संस्थापक कार्यक्रम असतात. पण राजकीयदृष्ट्या म्हटल्यात तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अमित शाहांनी अजित पवारांना हाताशी धरून पक्ष फोडला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजप बरोबर राहून कदापी मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हायला लागेल. आमचं देखील कुटुंब आहे ठाकरेंचं पण आमच्या स्वभावात त्यांच्या स्वभावात फरक आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक
संजय राऊत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “मी शरद पवारांना भेटलो ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन करिता आणि ते 17 मे ला आहे. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती. त्यांना ती दिली आणि अनेक विषयांवर चर्चा केली. शरद पवार जेष्ठ नेते आहेत आणि आमच्या सर्वांचे ते मार्गदर्शक आहेत,” असे मत खासदार राऊत यांनी मांडले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमित शाहांच्या तोंडावर मी राजीनामा मागितला असता
पहलगाम हल्ल्यावरील केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत राऊत म्हणाले की, “शरद पवार यांची भूमिका आहे, संकट काळामध्ये आपण सरकार बरोबर राहायला पाहिजे. मात्र, सरकार त्या लायकीचं नाही आहे. हे काय इंदिरा गांधीचे सरकार आहे का? की राजीव गांधीचे सरकार आहे की, मनमोहन सिंह यांचे सरकार आहे का? हे बदमाशांचे सरकार आहे. दुःखाची छटा देखील या सरकारमध्ये दिसत नाही आहे. अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाची बेईमानी करणार आहे. अमित शाह यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. आमचे 27 लोक मारले गेले का तुम्ही त्या खुर्चीवर बसला आहात. शरद पवारांनी मला विचारले की, तुम्ही त्या ऑल पार्टी मीटिंगमध्ये आला नाहीत. मी आलो असतो तर तिकडे गोंधळ झाला असता. अमित शाहांच्या तोंडावर मी राजीनामा मागितला असता आणि ते तुम्हा सगळ्यांना परवडलं नसतं. आम्ही सभागृहात देखील राजीनामा मागू,’ असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.