Mp sanjay raut target ncp Praful Patel and Sunil Tatkare on giving offers to sharad pawar mp mla
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर देखील राजकीय वर्तुळामध्ये नेत्यांच्या नाराजीला पूर आला आहे. यामध्ये आता मतदानामध्ये भारतामध्ये येणारी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करता येतो असा दावा विरोधतील नेत्यांसह एलन मस्कने याबाबत दावा केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. . याबाबत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अजित पवार गटावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईव्हीएम घोटाळ्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “अमेरिका कशाला तर सारं जग म्हणतयं ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. निवडणूक आयोग म्हणत असेल ईव्हीएम घोटाळा नाही, याचा अर्थ असा आहे भारताच्या निवडणूक आयोगातच घोटाळा आहेराजीवकुमार उद्या निवृत्त होतील, मग मोदी, शहा त्यांना कुठे तरी राज्यपाल करतील. महाराष्ट्र, हरियाणात ईव्हीएम घोटाळा झाला आहे. निवडणुक आयोगाने मारकडवाडीला येऊन बसावं. मग राजीव कुमार यांना बॅलेटपेपर आणि ईव्हीएममधील तफावत कळेल. भाजपने लोकशाही हायजॅक केली आहे. विधानसभेला झालं उद्या पालिका निवडणुकीत होईल. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या पक्षाबाबत गंभीर दावे करुन प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये वेगळा विचार करुन महायुतीसोबत आपली चूल मांडली. यानंतर आता अजित पवार गट हा शरद पवार गटातील खासदारांना ऑफर देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. खासदार सुप्रिया सुळें व्यतिरिक्त इतर खासदार व आमदारांना ऑफर दिली जात असून शरद पवार गटातील आमदार व खासदार आणल्यानंतर प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “जो पर्यंत शरद पवार गटाचे खासदार फुटत नाही, तो पर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार नाही. आणि मंत्रीपद हे प्रफुल पटेल यांना हवं आहे. प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलं आहे जो केंद्रामध्ये मंत्री पद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी तु्म्ही शरद पवार गटाचे सहा किंवा सात खासदार फोडलेत तर खासदार सुनिल तटकरे आणि हे सात मिळून तुमचा आकडा पुर्ण होईल तेव्हाच प्रफुल पटेल यांना मंत्री पद मिळेल असं सांगण्यात आलं आहे,” असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
तसेच ते पुढे म्हणाले की, “या राजकारणाचा फायदा महाराष्ट्राला किंवा अजित पवार यांना फायदा होणार नसेल पण प्रफुल पटेल आणि तटकरेंना मंत्री व्हायचं आहे. हा निर्लज्जपणा आहे. यांची फोडाफोडीची भूक भागत नाही शिवसेनेचे किती आमदार, खासदार संपर्कात आहेत म्हणतात नाव जाहीर करा. त्यांच्याकडे ईडी सीबीआय आहे त्याच्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. आमच्या किंवा पवारांच्या आमदार, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला. तर यात मुखवटा कोणाचा गळून पडतोय तो देवेंद्र फडणवीस, मोदी व शहा याचा आहे. आज ना उद्या तुमच्याही राजकारणातल्या तिरड्या उचलल्या जाणारच आहे. देशाच्या इतिहासात तुमची नोंद अत्यंत वाईट पद्धतीने केली जाईल,” अशी गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.