MP Sanjay Raut Targets Amit Shah Over Waqf Bill Amendment Mumbai Land Transactions
मुंबई : वक्फ बोर्डवरुन देशभरामध्ये राजकारण रंगले आहे. वक्फ बोर्ड सुधारक विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात आले आहे. रात्री उशीरा हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यावरुन देशामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज (दि.04) हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात येणार आहे. याबाबत राज्यसभेमध्ये काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ठाकर गटाने वक्फ बोर्ड सुधारक विधेयकाला विरोध दर्शवला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून अमित शाहांवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. वक्फ बोर्ड सुधारक विधेयकांबद्दल उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मत मांडणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, आमची भूमिका उद्धव ठाकरे सविस्तरपणे मांडतील. पहाटेच्या सुमारास हे वक्फ विधेयक पास झालं. जसं काय देशामध्ये खूप मोठी क्रांती करत आहेत अशा प्रकारचा एक माहोल सरकारने तयार केला. बील मंजूर झालं आणि आमचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले. या बिलामुळे या देशामध्ये काय झालं? हा सगळा व्यवहार मुस्लीमांच्या संपत्तीवर कब्जा करण्यासाठी बनवण्यात आला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “वक्फ सुधारक विधेयक हा एक भ्रष्टाचार आहे. प्रत्येक गोष्टीवर हिंदू मुस्लीम करायचं. या देशाचा राष्ट्रीय खेळ पूर्वी हॉकी होता. त्यानंतर जय शहा यांनी क्रिकेट खेळ करत राष्ट्रीय खेळ क्रिकेट केला. हिंदू विरुद्ध हिंदू आणि मुस्लीम विरुद्ध मुस्लीम असा नवीन धार्मिक खेळ त्यांनी सुरु केला आहे. हिंदू आणि मुस्लीम यांच्याविरोधातील हा नवा राष्ट्रीय खेळ या लोकांनी सुरु केला आहे. वक्फ विधेयकामधून फार मोठे असे महान कार्य आणि गरिब मुस्लीमांना मदत आणि त्यांचा उद्धार होणार आहे अशी भाषा जी काल केली. ते पूर्णपणे ढोंग आहे. अडीच लाख कोटींच्या वर ज्या प्रोपर्टीचे मुल्य केलेले आहे. अशा मालमत्तेवर आपला अधिकार रहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला. यामधून अल्पसंख्याक, मुस्लीम आणि त्यांच्या महिला यांचा उद्धार कसा होणार?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “काल अमित शाह यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे आणि दर्गे यांना ते हात लावणार नाहीत. पण रिक्त जमिनींची विक्री करु. त्या पैशातून आम्ही गरिब मुस्लीम महिलांना आम्ही दान देऊ. म्हणजे शेवटी ते खरेदी विक्रीवर आले आहेत. मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करु हे नकळत सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं. या मोकळ्या जमिनीची किंमत 2 लाख कोटी रुपये आहे. जशी धारावीची जमीन आणि देशभरातील विमानतळे विकण्यात आली. वक्फच्या जमिनींचा व्यवहार आणि व्यापार करायचा आहे. या देशामध्ये विकणारे दोन आणि विकत घेणारे दोनच आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील जमिनीवरुन देखील अमित शाहांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “या लोकांना ऑरिजनल शिवसेनेची दिवस रात्र आणि पहाटे भीती वाटत आहे. ही आता सुद्धा सांगतो. मुंबईतील वक्फ बोर्डचा व्यवहार हा आधीच ठरला आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरुप आणण्यासाठी हे विधेयक आणले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना उघड पाडणार आहोत. आणि पाडत आहोत. अमित शाह यांचं भाषण ऐकलं तर मुस्लीमांचं इतकं लांगूलचालन बॅरिस्टर जीना, औवीसी यांनी देखील केले नाही. इतक्या भयंकर पद्धतीने त्यांनी भाषण केलं. त्यांचं भाषण म्हणजे मुस्लीम लांगूलचालनाचा अतिउच्च नमुना होता,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.