भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत (फोटो सौजन्य-X)
पाटणा : देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका होणे बाकी आहे. यापूर्वी, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांत या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता बिहारमध्ये विधानसभा घेतल्या जाणार आहेत. सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यात आता भाजपने बिहारकडे विशेष लक्ष ठेवले आहे. त्यानुसार, नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलासह लोजपा, हम या पक्षांना भाजप सोबत घेणार आहे.
आता एनडीएने बिहारमधील २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बिहारची निवडणूक भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी खडतर असण्याची शक्यता आहे. राज्यातील वाढते स्थलांतर, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवरून नितीश कुमार सरकारला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या विधानसभा निवडणुका २०२६ मध्ये होणार आहे. त्याआधी बिहारची निवडणूक जिंकणे रालोआसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीमुळे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बळकटी मिळेल.
महाराष्ट्र पॅटर्न ठरणार यशस्वी ?
महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले. दिल्लीत आम आदमी पार्टीला सत्तेतून बाहेर करत भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सत्ता स्थापन केली. यानंतर आता या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच ३० मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी बिहारचा दौरा केला होता. त्यांचा हा दौरा बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, अमित शाहा यांनी बिहारमधील भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर दोन दिवस घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एकजुटीवर भर दिला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांचाही उल्लेख केला.
भाजपकडून विशेष लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपर्यंत दर महिन्याला राज्याचा दौरा करतील, असेही शहा यांनी यावेळी सांगितले. याशिवाय बिहार दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाच्या ८४ आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी दिली. या निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. राज्यात बूथ व्यवस्थापन तसेच लाभार्थी योजनांची अंमलबजावणी यामुळे भाजपाला मोठे यश मिळाले आहे.