Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर मतदारसंघात बहुरंगी लढत; बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे समीकरणे गुंतागुंतीची (File Photo)
भाजपने ऐनवेळी डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील इच्छुकांच्या राजकीय अपेक्षांनाही धक्का बसल्याची चर्चा झाली. त्यानंतर शरद लाड यांच्यासह काही इच्छुकांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले, तर महायुतीतील शिवसेनेच्या काही घटकांकडूनही स्वतंत्र उमेदवारीची भूमिका पुढे आली आहे. त्यामुळे महायुतीची संघटनात्मक ताकद असली तरी अंतर्गत मतांचे व्यवस्थापन हे भाजपसमोरचे महत्त्वाचे आव्हान ठरू शकते. भाजपच्या डॉ. स्मितादेवी योगेश जाधव या डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षण, माध्यम, उद्योग आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांचा अनुभव हा त्यांच्या उमेदवारीचा प्रमुख आधार मानला जात आहे. त्यांनी पदवीधरांचे रोजगार, कौशल्यविकास, स्टार्टअप्स आणि युवकांच्या संधी या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या हर्षदा देशमुख-जाधव या मैदानात असून, त्या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत.
शिक्षण क्षेत्रातील संस्थात्मक अनुभव असलेला चेहरा
शिक्षण, सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित कामाची त्यांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे एकीकडे शिक्षण क्षेत्रातील संस्थात्मक अनुभव असलेला चेहरा, तर दुसरीकडे प्रशासकीय-सामाजिक पार्श्वभूमी असलेला चेहरा अशीही या लढतीची एक बाजू आहे.






