दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमीत एसएसजीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाखांची मदत केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती आणि पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन पाण्याच्या गरजा तसेच पशुधनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना वेळेवर मदत मिळणे गरजेचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन सुमीत एसएसजीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी केवळ आपल्या नियमित कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहता समाजाच्या व्यापक हितासाठी योगदान देण्यावर भर देत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सुमीत एसएसजी हा भारतातील सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस आणि स्पेनमधील एसएसजी ट्रान्सपोर्टे सॅनिटारियो यांच्यातील इंडो-स्पॅनिश संयुक्त उपक्रम आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) १०८ प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी सवलतधारक कंपनी म्हणून सुमीत एसएसजी, बीव्हीजी इंडिया यांच्या समवेत १० वर्षांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP-DBFOT) मॉडेलअंतर्गत कार्यरत आहे.
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १,७५६ वाहनांचा आपत्कालीन प्रतिसाद ताफा तैनात करून त्याचे संचालन करण्याची जबाबदारी कंपनीकडे आहे. जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि प्रगत प्रशिक्षण पद्धतींचा वापर करून राज्यभर सक्षम आणि दर्जेदार आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.






