ncp amol mitkari gives response to congress amol londhe over amravati felicitation
अमरावती : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशामधून रोष व्यक्त केला जात आहे. यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये या दु:खद घटनेनंतर देखील भाजपकडून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावरुन राजकारण तापले आहे. कॉंग्रेस नेते अतुल लोंढे आणि महायुतीमध्ये वाद पेटला आहे.
“अमरावतीमध्ये 26 तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, अशी टीका कॉंग्रेस नेते अतुल कोंढे यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यांच्या या टीकेनंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या टीकेला उत्तर देताना विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, “काँग्रेस पक्षात कुठेही समन्वय नाही. अतुल लोंढे यांना राम शिंदे यांच्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.”
ते पुढे म्हणाले, “पहलगाममधील हल्ला हा देशावर होता, त्यामुळे संपूर्ण देश शोकमग्न आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राम शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे अतुल लोंढे यांच्या पोटात दुखायचे काही कारण नाही. काँग्रेसमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे. काँग्रेस स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाला संपवण्याचे काम करत आहे.” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर त्याचवेळी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.