ncp jitendra awhad chhaava movie review in marathi
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा आणि जीवनगाथा सांगणारा छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मागील अनेक दिवसांपूर्वी चर्चेत आहे. छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला असून पहिल्या दिवशीच या कोट्यवधी रुपयांचा गल्ला कमावला आहे. छावा चित्रपटावर आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहे. शरद पवार पक्षाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील छावा चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट पाहिला. हा चित्रपट त्यांच्या पसंतीस उतरला आहे. यावर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून राजकीय टोमणा देखील मारला आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत “छावा” सिनेमा बघायला जातोय… उत्सुकता आहे, काय दाखवले आहे याची ! पण, कायम या शूरवीराची येथील जातीयवादी, मनुवादी आणि सनातन्यांनी केली आहे. खरंतर अत्यंत धुरंधर, अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला हा महाराष्ट्राचा शिरोमणी होता. इथल्या जातीयवादी- मनुवाद्यांनी कायम छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. या मागील कारण म्हणजे त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभाव आणि त्यांचा माणसे ओळखण्याचा वकूब !
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यावरील संकट थोपविण्यासाठी मुघल सरदार दिलेर खान यांच्याशी हातमिळवणी केली होती. मात्र, काही जणांनी संभाजी राजांवर छत्रपती शिवाजी महाराजांशी द्रोह केला होता, असा शिक्का मारला. पण, इतिहास असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराज ६ ऑक्टोबर १६७६ ला कर्नाटक मोहिमेसाठी-दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. संभाजी महाराजांना बरोबर घेतले नाही. त्यामागे हे कारण आहे की, आपल्या पश्चात स्वराज्यावर कोणते संकट येऊ नये, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी राजे यांनी ठरवून दिलेरखानाशी हातमिळवणी करण्याची योजना आखली होती.
नंतरच्या काळात ज्यांनी स्वराज्याशी द्रोह केला होता; त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी माफही केले होते. त्यामध्ये अण्णाजी दत्तो आणि चिटणीस बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद यांचा समावेश होता. मात्र, जेव्हा औरंगजेबाला कंटाळून त्याचा मुलगा अकबर संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला. संभाजी राजे यांनी त्याला पाली नजीकच्या सुधागड येथे ठेवले. त्या अकबराशी चर्चा करण्यासाठी संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो याला पाठविला. मात्र त्याने अकबराला संभाजी महाराज यांच्याशी द्रोह करण्याची चिथावणी दिली. परंतु, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आलेल्या अकबराने ही सर्व हकीकत मित्र म्हणून संभाजी महाराजांना कळवली. सारख्या सारख्या होणाऱ्या दगाबाजीला कंटाळून संभाजी महाराज यांनी अण्णाजी दत्तो आणि चिटणीस बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. तो राग मनुवाद्यांच्या मनात खदखदत होता. त्याच मनुवाद्यांनी घात केला. जेव्हा संभाजी राजे हे संगमेश्वरला मुक्कामी असल्याची बातमी या मनुवाद्यांनी औरंगजेबाला कळविले. त्या आधारे औरंगजेबाचा सरदार शेख निजाम उर्फ मुकर्रबखानाने संगमेश्वरवर हल्ला चढवला अन् संभाजी महाराजांना अटक करून बहादूरगड येथे नेण्यात आले. तेथे त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. हे सर्व मनुवाद्यांचे कपट-कारस्थान होते. ज्या पद्धतीने संभाजी राजांचे हालहाल करून हत्या करण्यात आली. त्याकडे पाहता, मनुवाद्यांच्या “स्मृती” तील शिक्षेचा अवलंब झाल्याचे दिसून येते. कारण, प्रचंड शूरत्व अंगी असलेले छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या हाती कधीच लागले नसते. पण, स्वराज्यद्रोही मनुवाद्यांनी औरंगजेबाशी हातमिळवणी करून स्वराज्याचा घात केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये मनुवाद्यांचे वर्चस्व असल्याने या समरधुरंधर ,ज्वलज्वलंतेजस, महापराक्रमी ,रणझुंझार , तेजस्वी राजपुत्रावर अन्यायच झाला. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले. त्यामागे एकच कारण होते ते म्हणजे, त्यांनी मनुवादी- सनातन्यांविरोधात घेतलेली भूमिका; कर्मकांडावर त्यांनी केलेली आगपाखड आणि मनुवादी स्वराज्यद्रोह्यांना दिलेली देहांत शिक्षा !