NCP leader Chhagan Bhujbal appeals to maintain peace in Nagpur Violence riots
मुंबई : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबर उखडण्याच्या मुद्द्यांवरुन दंगल झाली. यामध्ये जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये पोलिसांवर देखील जमावाने हल्ला करुन त्यांच्यावर दगडफेक झाली. दंगलीमध्ये तब्बल 34 पोलीस जखमी झाले आहेत. नागपूरमधील महाल परिसरामध्ये ही घटना घडली. यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असून काही भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात आता सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भुजबळ यांनी शांतता राखण्याचे देखील आवाहन केले आहे.
नागपूरमध्ये काल रात्री (दि.17) महाल परिसरामध्ये दंगल झाली. यामध्ये जमावाने लोकांचे मोठे नुकसान केले. तसेच जीसीबी देखील जाळले. तोडफोड केल्यामुळे आणि दगडफेक केल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “माझी सगळ्यांना विनंती आहे. राज्यातील सर्व धर्मीयांना, सर्व पक्षीयांना विनंती आहे कृपया करुन राज्यात अशांतता निर्माण करु नका,” असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने 16 लाख कोटी रुपयाचे उद्योग राज्यात आणले आहेत. मात्र राज्य अशा मुद्द्यांमुळे अशांत झालं, तर कुठलाही उद्योग येताना दहा वेळा विचार करेल. जेव्हा उद्योग येतील तेव्हा सर्व धर्माच्या, पक्षांच्या लोकांना उद्योग, रोजगार मिळणार आहे आणि राज्य एक पाऊल पुढे जाणार आहे,” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
आमदार छगन भुजबळ म्हणाले की, “नागपूरमध्ये कोणीही कायदा हातात घेऊन नये, पोलिसांवर अजिबात कोणीही हल्ला करता कामा नये. कायदा जो कोणी हातात घेईल त्याच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि राज्यामध्ये तसं होणार नाही यासाठी सर्व नेत्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजे,” असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये देखील नागपूर दंगलीवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी लढत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण योग्य आहे का, असा माझा सवाल आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. औरंगजेबाने आपली मंदिरे पाडली, आपल्या आया बहिणींची अब्रु लुटली, शंभुराजे सापडत नव्हते तर निष्पाप लोकांचे बळी घेतले. लाखो लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले, हा इतिहास असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण योग्य नाही. आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. एक सच्चा देशभक्त मुसलमानपण या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणार नाही.” असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपला संताप व्यक्त केला.