jayant patil as next cm of maharashtra said sharad pawar
वाई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निव़डणूक जाहीर केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीला घेरले होते. शरद पवार यांना थेट आव्हान देत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असे फडणवीस म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना जेष्ठ नेते शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी सूचक विधान केले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी येणार असल्याचे शरद पवार म्हणाले. ते म्हणाले, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे. त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे. महाराष्ट्राची जी प्रतिमा महायुतीमुळे मलीन झाली आहे ती सुधारण्याची आवश्यकता आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करु शकतात याची मला खात्री आहे. असे सूचक विधान शरद पवार यांनी केले. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
हे देखील वाचा : भाजपने झारखंडला 20 वर्षे मागे नेले…; मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घणाघाती टीका
पुढे शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या कामाचे आणि प्रचाराचे कौतुक केले. शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांनी सात हजार किमीची शिवस्वराज्य यात्रा काढली. तसंच ते सुमारे ७६ मतदारसंघांमध्ये गेले होते. आपलं राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला आणि त्यांनी लोकांमध्ये आशा पल्लवित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राला योग्य दिशा देतील. तसेच महायुतीवर निशाणा साधत शरद पवार म्हणाले की, मतदारांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारने मग विविध योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केल्याचं महायुतीने सांगितलं पण महिला सुरक्षेचं काय? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.