ncp sharad pawar gives reaction on amit shah on maharashtra politics
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असून महायुती मात्र पुढील निवडणुकींच्या तयारीला लागली आहे. यामध्ये राज्यस्तरीय बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह हे शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्राने संपवलं असं म्हणत जोरदार टीका केली होती. यावर आता शरद पवार यांनी भाजपमधील जुन्या नेत्यांची नावं घेऊन अमित शाहांवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “देशाच्या गृहमंत्रिपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते. आपल्या शेजारचं राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या प्रशसकांचं वैशिष्ट्य होतं, की यापैकी कुणालाही तडीपार केलं गेलं नाही. आज त्या नेत्यांची मला आठवण होते आहे,” असं शरद पवार म्हणाले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे शरद पवार म्हणाले की, “देशाच्या गृहमंत्र्यांनी शिर्डीत भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीबहुत माहिती घेऊन भाषण केलं तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. १९७८ चा संदर्भ देऊन अमित शाह यांनी माझी आठवण झाली. १९७८ पासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. त्यांना कदाचित माहीत नसेल १९७८ मध्ये म्हणजे ४० वर्षांपूर्वी अमित शाह नक्की कुठे माहीत नाही. १९७८ मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू आडवाणी असे जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. १९७८ च्या पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. हशू आडवाणी नगरविकास मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान लोक माझ्या बरोबर काम करत होते,” असा टोला शरद पवार यांनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा
पुढे शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर देखील उत्तर दिले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंबाबतही त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्ही पाहिलं. उद्धव ठाकरे हे त्याबाबत त्यांचं मत मांडतील. हे गृहस्थ जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा मुंबईत आले, बाळासाहेबांच्या घरी ते गेले होते. या गृहस्थांना सहकार्य करावं अशी विनंती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. यापेक्षा अधिकची माहिती उद्धव ठाकरे सांगतील असाही टोला शरद पवार यांनी लगावला. दुर्दैवाने पातळी घसरली किती ते सांगायला ही उदाहरणं पुरेशी आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्यांची नोंद त्यांच्या पक्षातही घेतली जाणार नाही असं मला वाटतं,” असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.