ncp sharad pawar live on pm narendra modi retirement
Sharad Pawar Live : कोल्हापूर : जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजप नेत्यांकडून संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि विविध उपक्रम राबवून वाढदिवस दणक्यात आला. याबाबत शरद पवार यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. त्याचबरोबर राजकीय संन्यासाबाबत देखील शरद पवार यांना प्रश्न करण्यात आला. आपल्या खास शैलीमध्ये शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींचा 75 वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मी देखील त्यांना पत्र लिहिलं, अभिनंदन केलं. आम्ही सगळे जण यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलंही राजकारण आम्ही आणत नाही. अनेकांनी मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “माझा 75 वा वाढदिवस होता. त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणलं नाही आम्हीही आणू इच्छित नाही,” असे देखील मत शरद पवार यांनी व्यक्त केले. पत्रकारासोबत हा संवाद सुरु असताना पत्रकार आणि शरद पवार यांच्यामध्ये एक किस्सा घडला. पत्रकारांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करताना त्यांना शरद पवार यांचे शिष्य असा केला. यावर कुशल राजकारणी असलेल्या शरद पवार यांनी लगेचच टोला लगावला. तुमचे शिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस झाला.. असा प्रश्न पत्रकार विचारताना शरद पवारांनी वाक्य मध्ये थांबवत पत्रकाराला थांबवलं आणि विचारलं “मोदी माझे शिष्य? झोप झाली आहे ना तुमची?” असे शरद पवार म्हणताच एकच हास्यकल्लोळ झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अलिखित नियम हा वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्ती घेणे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता पंचाहत्तरी गाठल्यानंतर निवृत्त होणार का याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले की, मी ७५ व्या वर्षानंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावं हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी आता ८५ वर्षांचा आहे, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे गटाची जोरदार मागणी असली तरी शरद पवार गटाची मात्र पंतप्रधानांच्या निवृत्ती कोणतीही मागणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.