Sharad Pawar's reaction to Thackeray group's decision to contest municipal elections on its own
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचा झालेला एकतर्फी विजय आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव यामुळे राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे होताना देखील दिसू शकतात. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यावरुन कॉंग्रेस विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होताना दिसली. यावर पहिल्यांदा जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका उद्धव ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी मिळेल असे कारण देऊन स्वबळाचा नारा देण्यात आला. यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणावर आता शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ही टोकाची भूमिका असल्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जेष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याच्या अधिकार दोन्ही पक्षांना आहे. परंतु, दोन्ही पक्षांचे मेळावे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक लोकांची उपस्थिती होती”. यावेळी पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेबाबत विचारले असता ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केलं. ते त्यांचं मत आहे. मात्र, त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही”, असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या काही काळात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. मुंबई, संभाजीनगर नाशिक या सर्व महापालिकांमधील आपल्या पदाधिकाऱ्यांशी, तिथल्या आपल्या नेत्यांशी बोलून झालं. सगळ्यांचं म्हणणं आहे की एकटं लढा, अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.