OBC leader Chhagan Bhujbal's aggressive against Maratha reservation Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून यावर मुंबई हाय कोर्टाने कडक भूमिका घेतली आहे. तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलकांना आझाद मैदानासह मुंबई रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली आहे.
ओबीसी नेते म्हणून पुढे आलेले मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये पार पडली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांना सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. तर मराठा समाजाला ओबीसी मधूम आरक्षण देऊ नये म्हणत ओबीसी नेतेही एकवटले आहेत. या बैठकीनंतर भुजबळ म्हणाले की, मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केलीय, तर आम्हीही मुंबई जाम करू शकतो, मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, असा स्पष्ट इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा आधार ते घेत आहेत, परंतु त्यात देखील मराठा आणि कुणबी वेगळे दाखवले आहेत. त्यावेळी, 1921 साली 2 लाख मराठा तिथं होते, तर 33 हजार कुणबी होते. देवेंद्र फडणवीस असोत की शरद पवार 50 टक्क्याच्या आत कोणीही आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाज आर्थिक, सामाजिक मागास नाही, तरीदेखील आरक्षणाची मागणी करत आहे. ईडब्ल्यूएस, एसईबीसी तसेच ओपन आणि ओबीसी अशा चार आरक्षणाचा फायदा घेत आहे,” असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये असून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाबाबत इशारा दिला आहे. भुजबळ म्हणाले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मी कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचे दाखले दिले आहेत. मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, जर तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला देखील मुंबईला यावं लागेल. उद्यापासून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको ही भूमिका घेऊन राज्यभर आंदोलने केली जातील आणि निवेदन देखील दिल जाईल,” असा स्पष्ट इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत देखील भुजबळ यांनी भूमिका मांडत हा केवळ मूर्खपणा असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, मराठा कुणबी एक होऊ शकत नाही. मराठा आणि कुणबी एक, हा मूर्खपणा आहे. केंद्र सरकारने एक कायदा बनविला आहे, जे ओबीसी, दलित किंवा आदिवासीमध्ये बसत नाहीत, पण ते आर्थिक मागास आहे. त्यानुसार, सामाजिक दृष्ट्या EWS आरक्षण लागू झाले आहे. त्यात 10 टक्के आरक्षण आहे, इतर 8 टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहे हे सरकारने जाहीर केले आहे, असेही भुजबळांनी म्हटल. पाटीदार, जाट, गुजर आणि काबूचे आंदोलन मागे झाले होते,” असे देखील मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.