Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणाच्या उपसमितीकडून मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विजय सूर्यवंशी आणि सचिन गणेश पाटील हे दोघे मनोज जरांगे यांच्याकडे मसुदा घेऊन गेले आहे. मनोज जरांगेंसोबत चर्चा केल्यानंतर या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार आहे.
कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार आहे.
हैदराबाद गॅझेटियर जसंच्या तसं लागू करता येऊ शकत नाही. कारण गॅझेटीयरमध्ये केवळ लोकसंख्या आहेत. त्यात स्पष्टता नाही. त्यामुळे ते जसच्या तसं लागू करता येणार नाही. अशी सरकारी पातळींवरील चर्चा आहेत. या सर्व अडचणींत मध्य मार्ग काढून तात्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनिल आर्दड हैदराबाद गॅझेटियरची प्रत घेऊन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीला सुनिल आर्दड यांच्याकडूनही समर्थन देण्यात आलं. त्यानंतर निल आर्दड पुन्हा गॅझेटियरची प्रत घेऊन विखे पाटील यांची भेट घेतली.
“हैदराबाद गॅझेटीयर” (Hyderabad State Gazetteer) ठळक मुद्दे असे —
१९०१ ची जनगणना : हैदराबाद संस्थानात झालेल्या जनगणनेची प्रत सन १९०९ मध्ये प्रकाशित झाली.
लोकसंख्येचा तपशील : या प्रतीनुसार त्याकाळी मराठवाडा विभागात सुमारे ३६ टक्के लोकसंख्या मराठा–कुणबी समाजाची होती.
मराठा आणि कुणबी एकच : या गॅझेटीयरमध्ये मराठा आणि कुणबी यांचा परस्परसंबंध दाखवण्यात आला असून, हे दोन्ही एकच असल्याचा उल्लेख आहे.
स्रोत उपलब्धता : ही प्रत उत्तराखंडातील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, मसुरी येथे उपलब्ध असल्याचे नमूद होते.
जिल्हानिहाय नोंदी : या प्रतीमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांनुसार कुणबी–मराठा लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे.