Protest in Vadgaon Maval over co-accusation after Dhananjay Munde's resignation
वडगाव मावळ : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनी त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत तहसिलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर हादरवून सोडलेल्या सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील काही गोष्टी काल प्रसार माध्यमातून पुढे आल्या. अतिशय अमानवी, क्रूर पद्धतीने खून झालेल्या मत्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी हत्या करतानाचे व्हिडिओ आणि फोटो प्रसार माध्यमातून समोर आले. क्रौर्याची परिसीमा गाठत केलेले कृत्य भयाण असून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी हत्या केली हे समोर आले असून देखील हत्येतील आरोपी वाल्मिक कराड माझ्या जवळचा माणूस असे म्हणत त्याला पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून विधीमंडळ सदस्याचा राजीनामा दिला नाही, त्यामुळे जनतेची आणि अखंड मराठा समाजाची भावना तीव्र आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याला पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे याचा तातडीने विधीमंडळ सदस्याचा राजीनामा घेण्यात यावा. त्याचे व त्याच्याशी संबंधित सर्वांचे CDR तपासून आरोपींना मदत केल्याचे सिद्ध होत असल्यास त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी. मुख्य आरोपी वाल्मिक कराड सह धनंजय मुंडे पास सह आरोपी करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले. संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो देखील आता समोर आले आहेत. या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे. मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यावरील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र फक्त राजीनामा नाहीतर धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे.