Rupali Chakankar criticism and Rupali Patil Thombare praise on Vaishnavi Hagawane suicide case
पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळीचा बळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले होते. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष होता. यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असली तरी देखील राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांवरुन राजकारण तापले आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळातून देखील आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या. वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबाला राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला होता. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या कास्पटे परिवाराने न्यायाची मागणी केली होती. याचबरोबर तिचे 9 महिन्यांचे बाळ देखील बेपत्ता होते. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे या राजकीय पार्श्वभूमीमधील होता. या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे याची अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी कास्पटे परिवाराची भेट घेतली त्यांना बाळाचा ताबा मिळवून दिला. तसेच या प्रकरणामध्ये पक्षाचा कोणताही पाठिंबा राजेंद्र हगवणेला नसल्याचे देखील रुपाली पाटील यांनी स्पष्ट केले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कास्पटे परिवाराची भेट घेत हगवणे परिवाराला कोणतेही राजकीय पाठबळ नसल्याचे सांगितले. तसेच हगवणे कुटुंबाबत अजित पवारांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे रुपाली पाटील यांनी स्पष्ट केले होते. वैष्णवी हगवणे हिचे 9 महिन्यांचे बाळ देखील कस्पटे परिवाराकडे परत आणण्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच बाळ आणून देखील दिले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांनी दाखवलेली आत्मयिता आणि संवेदनशीलता याचे राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.
अखेर चाकणकरांनी घेतली भेट
तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर मात्र टीका केली जात आहे. या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. मात्र राज्य महिला आयोगाने याची दखल तप्तरतेने न घेतल्याचा आरोप केला जात आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर अनेकांनी टीका केल्यानंतर अखेर चाकणकर यांनी आज (दि.23) कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर देखील काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दरवाज्यामध्ये थांबवून जाब विचारला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पदाची गरिमा सांभाळा…
यावेळी छावा संघटनेच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकरांना घेरले. मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांना सुनावले. तसेच संविधानिक पदावर असल्यामुळे तुम्ही भूमिका मांडणार नाही, तर असं चालत नाही. तुम्ही आधी दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती. हे अति होत नाहीये. तर तुम्ही बोलले पाहिजे. कास्पटेच्या दारामध्ये येऊन तुम्हाला विनंती करावी लागती की बोला म्हणून. ज्या पदावर आहात त्याची गरिमा सांभाळा, अशा शब्दांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांना खडेबोल सुनावले आहे.
सुषमा अंधारेंकडून ‘रुपाली’चे कौतुक
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच रुपाली पाटील ठोंबरे यांनी कस्पटे कुटुंबियांना धीर दिल्याबद्दल कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “चाकणकरांची रूपाली असंवेदनशीलतेने वागली तरी ठोंबरेंच्या रूपालीने दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. दादा, 100 पैकीं 90 प्रकरणात अत्यंत अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या निकषावर दिले असेल बरे?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी देखील उपस्थित केला आहे.