School Education Minister Dada Bhuse made teaching Marathi language mandatory in schools
मुंबई : राज्यामध्ये मराठी भाषिक लोकांवर हल्ले केले जात आहे. असे प्रकार सर्रास राजधानी मुंबईमध्ये सुरु असताना आता मराठी भाषेबद्दल आनंदवार्ता समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र याबाबत अद्याप शासन आदेश जारी करण्यात आला नव्हता. मंत्री उदय सामंत यांच्या बातचीतनंतर आता शासन आदेश काढण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा शाळेमध्ये शिकवण्याबाबत देखील राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळेचे प्रमाण वाढते आहे. इंग्रजी शाळांमधून मराठी शिकवण्याची टाळाटाळ केली जात आहे. तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. महाराष्ट्रामधील शाळांमध्ये मराठी भाषेचा आग्रह मागील अनेक वर्षांपासून केल जात आहे. याबाबत आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर दादा भुसे यांनी शालेय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. दादा भुसे हे आता ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी सर्व शालेय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा संस्थाचालक संघटना यांच्याशी संवाद साधून चर्चा देखील केली आहे. “यानंतर आता त्यांनी मराठी भाषा शिकवण्याबाबत निर्णय घेतला असून मराठी भाषा सर्व मराठी, इंग्रजी माध्यमातील भाषांना अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देखील दादा भुसे यांनी दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना दादा भुसे पुढे म्हणाले की, “शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल. इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे. आता या भाषेला केंद्राकडून अभिजात ही दर्जा मिळाला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे. मात्र तरी काही शाळा यातून पळवाट काढत आहेत. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे. त्यानुसार मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे”, अशा सूचना दादा भुसे यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
“तसेच मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे. ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील, त्याची तक्रार पालकांना करता येणार आहे. तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे”, असा सूचक इशारा देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.