sharad pawar mla jitendra awhad target modi government over caste census
मुंबई : केंद्र सरकारकडून देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मागील अनेक वर्षांपासून कॉंग्रेस पक्ष याची मागणी करत होते. त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या पदयात्रेमध्ये हा मुद्दा उचलून धरला होता. आता जातीनिहाय जनगणनेची घोषणा झाल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. भाजप अचानक जातगणनेला तयार का झाली? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारला प्रश्न केले आहेत. आव्हाड म्हणाले की, तेथील काश्मिरी लोकांनी आपला जीव धोक्यात घालून वाचविण्याचा प्रयत्न केला. तिथे एकही सैनिक का नव्हते? हे धक्कादायक असून हे केंद्र सरकारचं अपयश दाखवते. प्रश्न विचारणाऱ्यालाच ताब्यात घेतलं जातं. जबाबदारीवर कोणी बोलायला तयार नाही. पाकिस्तानला जो काही धडा शिकवायचा आहे, तो शिकवा आम्ही सोबत आहोत. सैनिकांची संख्या कमी का, यावर कोणी बोलत नाही. सैनिकांना पेन्शन दिली जात नाही. जनतेपासून काहीतरी लपवून ठेवून द्वेषाचं राजकारण सुरू आहे, असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भाजप कायम निवडणुकांचा विचार करत असते. बिहारमध्ये 63 टक्के ओबीसी समाज आहे. Evm प्रमाणे जातीय जनगणनेत हेराफेरी झाली तर सगळंच संपेल. काश्मिरमध्ये सैनिक का नव्हते, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. राज्यात नवीन सिस्टीम सुरू झाली आहे. सगळ्या फाईली उचलायच्या आणि मंत्रालयात पाठवायच्या. टक्केवारी पोहचविणारे दलाल सकाळची गाडी पकडून मंत्रालयात जातात, कुठल्यातरी बंगल्यात डिपॉझिट केलं की झाली कामं, ही सिस्टीम सुरू झालीये,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
संजय राऊत मोठा माणूस…
पहलगाम हल्ल्यावरुन खासदार संजय राऊत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “शरद पवार यांनी राजीनामा का मागितला नाही, याचं उत्तर मी काय देऊ, त्यावर मी काय बोलणार? संजय राऊत मोठा माणूस… मी जे काही बोलायचं ते बोललो आहे. शरद पवार यांच्याबाबतीत मी काय बोलू? पण हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे. विलासराव देशमुख, शिवराज पाटील यांनी जबाबदारी घेऊन राजीनामे दिले होते,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवावर भाष्य केले. ते म्हणाले की, “पराभवाने कोणताही पक्ष संपत नाही, आमच्यासाठी कार्यकर्त्यांना लढण्यासाठी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय, असे आव्हाड म्हणाले. तसेच अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली. याबाबत आव्हाड म्हणाले की, 2004 चं काय मला आठवत नाही, एवढी माझी मेमरी स्ट्रॉंग नाही. स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वप्न पूर्ण होईल की नाही याचीही जाणीव असावी, अजित पवारांना वाटत असेल तर चुकीचं काय?” असे मत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.