sanjay shirsat on manoj jarange patil
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये विधानसभेचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून आकड्यांची व मतांची जुळवाजुळवी सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. सत्ताधारी महायुतीवर जरांगे पाटलांची नाराजी असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता महायुतीचे नेते परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला मनोज जरांगे पाटील हे समाजाला विचारुन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मागील दीड वर्षांपासून मराठा आरक्षणावरुन महायुती सरकारला घेरले आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून जरांगे पाटील यांनी आमच्या पाठिशी उभे राहावे, अशी विनंती महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. अशी विनंती शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्याचबरोबर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री 2 वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली असून मागील आठवड्याभरामध्ये ही त्यांची दुसरी भेट आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटलांना विनंती करत शिरसाट म्हणाले की, महायुतीने विकास कामांचा रिपोर्ट जनतेसमोर ठेवला आहे. लोकसभेला जो परिणाम झाला तो चुकीच्या नरेटीव्हमुळे झाला. तसेच जरांगे पाटील फॅक्टरमुळे देखील झाला. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मराठा समजाच्या हिताचे महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय लक्षात घेत मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : नांदेड लोकसभा पोटनिवडणुक रंगणार; पत्रक जारी करत काँग्रेसने केला उमेदवार जाहीर
त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शिरसाट म्हणाले की, धारावीचे टेंडर काढणारे तुम्ही अन् सुधारणा आम्ही केल्या. आणि आता पुन्हा प्रश्नही तुम्ही विचारता आहात. महायुतीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. इतरवेळी टीका करणारे महाविकास आघाडीचे नेते शेतकरी, बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? आरक्षणाचा मुद्दा का काढत नाही ? आरक्षणाच्या विषयावर बोलले तर अंगलट येईल, लोक विरोधात जातील, असे म्हणत शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.