sanjay raut target amit shah and pm modi for again on maharashtra tour
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. जागावाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका वाढल्या आहेत. काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदावरुन देखील तू तू मैं मैं सुरु आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कधी सुटणार आणि काय फॉर्मुला असणार याची चर्चा सर्वत्र आहे. सत्ताधारी नेत्यांनी देखील यावरुन निशाणा साधला आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षाची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल. त्यानंतर समजेल कोण कुठे लढत आहे. आम्ही आकडे याच्यावर बोलतच नाही आहोत. 200 जागा लढवणार, 100 जागा लढवणार असं काहीही आमच्यात चाललेलं नाही. शिवसेनेला किती जागा? वगैरे प्रश्न नाही. तिन्ही पक्ष आणि पक्षप्रमुख हे संख्येवर बोलतच नाही. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. लोकसभेला तेच सूत्र होते, विधानसभेला तेच सूत्र असणार आहे. उमेदवाराचे क्षमता काय पक्षाची ताकद याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल थोडा वेळ लागतो. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे. जागावाटपासाठी आमच्याकडे काही कुणी दिल्लीतून येणार नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार निवडणूक? कधी लागणार आचारसंहिता?
महायुतीच्या जागावाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील आठ दिवसांमध्ये दोन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यावरुन विरोधकांनी खोचक टोला लगावला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “देशाच्या गृहमंत्री येऊन बसले आहेत, प्रधानमंत्री ठाण्यामध्ये येत आहेत आज घोडबंदर उद्या कोपरी परवा पाचपाखाडी मग वाघबिल नंतर नौपाडामध्ये येतील. मग नंतर आमच्याकडे भांडुप गावात जातील. प्रधानमंत्री आहेत ते त्यांनी प्रधानमंत्री सारखे वागायला पाहिजे. सरदार पटेल जागा वाटपायला महाराष्ट्रात येऊन बसायचे का? सरदार पटेल, महात्मा गांधी राज्यात एकच सभा घ्यायचे. आमचे जे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत ते गल्ली बोळात फिरत आहेत ते पण देश वाऱ्यावर सोडून. एकाच मेट्रोचा सहा वेळा उद्घाटन करत आहेत. अरे एकच मेट्रो आहे,” असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.