Shivsena vinayak raut on manoj jarange patil Maratha reservation Mumbai news update
सिंधुदुर्ग : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे हजारो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तर संपूर्ण मुंबईमध्ये मराठा समर्थक जमा झाले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत आक्रमक झाले आहे. सिंधुदुर्गामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाला आहे. हे पाहिल्यावर सध्याच्या राजकारण्यांना मराठा समाजाच्या आंदोलनबाबत थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही. यावर ठोस निर्णय घ्यावाच लागेल हे लक्षात आले असेल, असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले की, आरक्षणाबाबत मर्यादा वाढविण्याबाबतची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी. मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनाद्वारे यश नक्कीच मिळेल, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यातील मराठा समाज जरांगे यांच्या बरोबर आहे. त्यांना नक्की यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
भागवत यांनी ही शिकवण भाजप मंत्रिमंडळात द्यावी
इस्लाम धर्म हा भारतामध्ये अनेक वर्षांपासून असून इस्लाम भारतात आल्यापासूनच आहे आणि इथेच राहील. इस्लाम या हिंदू विचारसरणीसारखा नाही. हिंदू विचारसरणी अशी नाही. आपण एक आहोत असा विश्वास ठेवावा लागेल. दोन्ही बाजूंनी विश्वास निर्माण होईल, मग हा संघर्ष संपेल, असे मोहन भागवत यांनी आरएसएसच्या १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. यावर विनायक राऊत म्हणाले की, भागवत यांनी ही शिकवण भाजप मंत्रिमंडळात असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांना द्यावी. आणि उपदेशाचे डोस पाजावेत. धर्मांमध्ये भांडणे लावण्यामध्ये नितेश राणे अग्रेसर आहेत, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चिपी-मुंबई सेवेबाबत देखील माजी खासदार विनायक राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, कॅबिनेटमध्ये चिपी विमानतळाबाबत निर्णय करण्याचा सरकारला अधिकार नाही. चिपी विमानतळ हा प्रश्न केंद्र सरकारशी निगडित आहे. हा प्रश्न केंद्रीय हवाई वाहतूक उड्डाण मंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. दुर्दैवाने हा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम खासदार मिळाला नाही, हे सिंधुदुर्गवासीयांचे दुर्दैव आहे, असे म्हणत विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना टोला लगावला आहे.