राज्यातील 'या' बड्या नेत्याने दिल्लीत जाऊन घेतली अमित शहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केंद्रातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीमुळे आगामी काळात मुनगंटीवार यांना पक्षात नव्या जबाबदाऱ्या देण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. याशिवाय, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अजून स्पष्टता नाही. दिल्लीतील दौऱ्यात मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी मंत्रिपदासाठी किंवा कोणतीही पदे मिळावीत म्हणून दिल्ली दौरा केलेला नाही. राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच भेटी घेतल्या आहेत.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत केवळ राज्यातील प्रश्नच नव्हते तर काही राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. त्यामुळे पक्षाकडून लवकरच मुनगंटीवार यांना कोणतीतरी महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांना मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू संशोधन संस्थेत तयार केलेला विशेष तिरंगा आणि डायरी भेट दिल्याची माहिती समोर येत आहे.
हेदेखील वाचा : डिजिटल आत्मनिर्भरता! Amit Shah यांनी Google आणि Microsoft केला राम राम, निवडला ‘हा’ भारतीय प्लॅटफॉर्म
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना राज्यात वेग आला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. काही दिवसांत महापालिकांच्या महापौरपदांचे आरक्षणही जाहीर होणार आहे. त्यामुळे आता राजकीय नेतेमंडळींकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता मुनगंटीवार यांनी अमित शहांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.