Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetty targets the Mahayuti for Ladki Bahin yojana
कोल्हापूर : राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. या योजनेमधून अपात्र महिलांच्या डोक्यावर अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. निवडणुकीनंतर महायुती सरकारने अर्ज छाननी प्रक्रिया सुरु केली. निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करण्यात आली. तसेच सर्वच अर्जदार महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर अर्ज बाद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महायुती सरकारकडून 2024च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महा दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. निवडणुकीच्यापूर्वी ही योजना जाहीर झाल्यामुळे अल्पावधींमध्ये ती लोकप्रिय झाली. महायुतीच्या नेत्यांनी योजनेचा जोरदार प्रचार देखील केला. निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा सरकार आल्यानंतर 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सुरु केली. यामुळे विरोधकांसह राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यावरुन आता राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले राजू शेट्टी?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरुवातीला पात्र महिलांना पैसे देऊन नंतर त्यांना अपात्र ठरवणाऱ्या महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले की, “निवडणुकीनंतर हे असंच होणार होतं. हे आता लोकांच्या लक्षात येत आहे. ही योजना एक सरकारी खात्यामधील पैशांतून महिलांना दिलेली लाच होती. लाडकी बहीण योजना, आनंदाची शिधा आणि महायुतीच्या इतर योजना या निवडणुकीसाठी मतदारांना दिलेल्या लाच होत्या आणि ती तेवढ्या काळापुरती होती,” असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “आपल्या राज्याची अर्थिक स्थिती नाजूक असल्याचे हे महायुतीच्या नेत्यांना माहिती होते. तरी देखील तत्कालीन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेची मतं घेण्यासाठी हा बनवा केला. या फसवणुकीविरोधात महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी जोरदार मागणी राजू शेट्टी यांनी केली. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. अजून किती बहिणी गायब होतील हे समोर येईलच,” अशा कडक शब्दांत राजू शेट्टी यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त खर्च
पहिल्यांदाच माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या आणि त्यांच्यावर झालेल्या खर्चाची किंमत समोर आली आहे. ही किंमती ऐकून सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.46 कोटी होती. मात्र अर्जाची छाननी केल्यानंतर ही संख्या पाच लाखांनी कमी झाली आहे. सध्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थी महिलांची संख्या 2.41 कोटींवर आली आहे. त्यामुळे अपात्र महिलांमुळे राज्याच्या तिजोरीमधील कोट्यवधी रुपये गेले आहेत. अपात्र महिलांनाही योजनेचे सहा महिन्यांचे हप्ते दिल्यामुळे सरकारला 450 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे सरकारचे 450 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.