Udayanraje bhosale controversial statement on india first girls schools not by Jyotirao Phule
पुणे : महात्मा जोतिराव फुलेंची जयंती साजरी केली जात आहे. राज्यसह संपूर्ण देशामध्ये जोतिराव फुलेंना आदरांजली वाहिली आहे. जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. यासाठी त्यांनी शेण आणि गोट्यांचा मार देखील सहन केला. तसेच समाजाचा रोष देखील सहन केला. मात्र आता जोतिराव फुले यांनी पहिली शाळा सुरु केली नव्हती या आशयाचे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिली. मात्र यानंतर त्यांनी मुलींच्या शाळांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले की, “मी फुले वाड्यामध्ये अभिवादन करण्यासाठी आलोय. शिवरायांच्या पश्चात अनेक समाज सुधारक यांनी चांगले विचार पोहचवण्याचं काम केलं, त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले हे एक होते. महात्मा फुले व्हिजनरी होते. आयुष्यभर कष्टकरून संपत्ती गोळा केली ती समाज सुधारणेसाठी वापरली,” असे शब्दांत उदयनराजे भोसले यांनी जोतिराव फुले यांच्याबाबत आदरयुक्त भावना व्यक्त केली. मात्र त्यानंतर शाळांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे टीका सुरु झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
फुले वाड्यामध्ये बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, “सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली,” असे उदयनराजे म्हणाल्यामुळे नवीन वाद सुरु झाला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उदयनराजे भोसले यांनी जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी केलेल्या वक्तव्याचा मंगेश ससाणे यांनी समाचार घेतला आहे. ससाणे यांनी उदयनराजे भोसल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, “उदयनराजेंना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नको आहेत. उदयनराजेंचं बोललेलं मी चार वेळा ऐकलं. महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचे महत्व कमी करायचं आणि त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचे महत्त्व वाढवायचं. शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मानतो. महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली यावर उदयनराजेंना आक्षेप आहे. उदयनराजेंनी जो गौप्यस्फोट केला तो धक्का देणारा आहे. इतिहास नव्याने लिहायचा हा छत्रपतींच्या वंशजांच्या प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत मंगेश ससाणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.