ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?
Shiv Sena Dasara Melava News in Marathi: आज विजयादशमीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. या संपूर्ण मेळ्यात त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावरही त्यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात धडाकेबाज भाषण केले. आपल्या या भाषणता त्यानी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मग पाच जुलैला काय केलं आम्ही? आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मातृभाषेचा अपमान होऊ देणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावर सक्ती करायची नाही.” “दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, अशा कंड्या पिकवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही मराठीला हात लावून बघा. हात जागेवर राहणार नाही.” मी तेव्हाच बोललेलो आहे की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,” असे मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, “वाघाचं कातड पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. पण गाढव ते गाढवत,” ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूराच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर न करण्यावरून सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, “”शेतकरी विचारतोय आम्ही खायचं काय… अशी परिस्थिती यापूर्वी कधीही घडली नाही. मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो, हे संकट फार मोठं आहे. पूर्ण मदत करू द्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करू. आजचे जे मुख्यमंत्री आहेत. ते आमचं सरकार होतं तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगत होते आणि आता म्हणत आहेत की ही संज्ञाच नाहीये. मी आजही सांगतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केलीच पाहिजे. मी माझ्या सरकारमध्ये कर्जमुक्ती केली होती. निवडणुकीच्या तोंडावर नाही.”