Pune Politics: युतीच्या चर्चेदरम्यान शरद पवार-अजित पवार गटात टोकाचे मतभेद, युतीच्या चर्चा फिस्कटल्या
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत युतीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत घड्याळ की तुतारी या चिन्हावर लढायच, यावरूनदोन्ही गटात वादाची ठिणगी पडली. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावर तोडगा न निघाल्यामुळे दोन्ही गटातील राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीच्या चर्चा जवळपास फिस्कटल्या आहेत.
घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी अजित पवार (ajit pawar) आग्रही होते. पण त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर ठाम होते. याच मुद्द्यावरून दोन्ही गटात मतभेद निर्माण झाले. अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाला ३५ जागांचा प्रस्ताव दिला. तसेच उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रही करण्यात आला, असेही बोलले जात आहे. चिन्हाचा वादावर तोडगा निघत नसल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तातडीने आपला प्लॅन बदलत महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चा सुरू केल्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. वरिष्ठ स्तरावरूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला होता. पुणे आणि पिपंरी चिंचवड हे गेल्या काही वर्षांपासून अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जात होते. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत दोन्ही महापालिकांवर आपले वर्चस्व राखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्याच चर्चा सुरू होत्या. पण चिन्हाबाबत एकमत न जाल्याने युती फिस्कटली. त्यामुळे आता शरद पवार महाविकास आघाडीतूनच आगामी महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Prashant Jagtap News: शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण
दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच पक्षांमध्ये जोरदार धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतूनच लढण्याचे महत्त्वाचे संकेत दिले. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र यावी, अशी आमची इच्छा असून त्याबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही दोघेही एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो असून, जिथे शक्य असेल तिथे येत्या काळात एकत्रित निवडणूक लढवली जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.






