
अहिल्यानगर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौलाकडे जिल्ह्याचे लक्ष
आगामी काळातील राजकीय समीकरणे आणि सहकारातील ताकद लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. बँकेच्या संचालक मंडळात जिल्ह्यातील बलाढ्य राजकीय घराणी आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने फराळाच्या बैठकांना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळाहाने थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या सहकार विकास पॅनेलचे २१ पैकी १८ संचालक निवडून आले आहेत. उर्वरित तीनमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना मानणारे दोघे आणि एक स्वतः खासदार निलेश लंके आहेत.
सभापती शिंदे यांना मानणारे सहकार विकास पॅनेलला साथ देणार हे जवळपास निश्चित आहे. अध्यक्षपदासाठी तीन चार नावे चर्चेत आहेत. परंतु सर्वात आघाडीवर आजही डॉ. विखे यांचेच नाव आहे. जो कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष असेल ती नावे सहमतीनेच अंतिम असतील. या पदाच्या निवडीसाठी गुरूवारी (दि. १२) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी मुंबईत घडामोडी होऊन अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होईल, असाच रागरंग आहे.
पक्ष भाजप, समर्थक मात्र माजी मंत्री थोरातांचे
सहकार विकास पॅनेलमध्ये मंत्री विखे आणि माजी मंत्री थोरात समर्थकांचा समावेश आहे. यात थोरात समर्थकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात बरीच मंडळी भाजपची आहेत. त्यामुळे मुख्यंमत्री फडणवीस यांनी फतवा काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे सहज शक्य आहे.
अध्यक्षपदासाठी आहेत दिग्गजांची नावे चर्चेत
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुरूवातीपासूनच माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे नाव चर्चेत आहे. आता माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे ही नावे चर्चेत आली आहेत. स्थानिक समीकरणांनुसार ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर होतो की, मातब्बर नेत्याकडेच बँकेची धुरा सोपवली जाते याबाबत उत्सुकता आहे.
राजकीय गणिते आणि सहकाराचा प्रभाव
जिल्ह्यातील आगामी निवडणुका आणि सहकार क्षेत्रावरील वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यामुळे केवळ बँकेचे कामकाज नव्हे, तर आगामी राजकीय गणिते डोळ्यांसमोर ठेवूनच मुख्यमंत्री अंतिम घोषणा करतील, असे बोलले जाते.
1. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय कधी होणार?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय गुरुवारी स्पष्ट होणार आहे.
2. अध्यक्षपदासाठी अंतिम निर्णय कोण घेणार?
अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कौल महत्त्वाचा मानला जात आहे.
3. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनेलला किती जागा मिळाल्या?
सहकार विकास पॅनेलचे २१ पैकी १८ संचालक विजयी झाले.