फोटो सौजन्य- pinterest
आचार्य चाणक्य हे एक महान नीतिशास्त्रज्ञ आणि सखोल विचारवंत होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्या अनुभवांना त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये स्थान दिले. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि काही चुका झाल्या तर नातेसंबंध बिघडतातच पण आयुष्यात अशांतताही निर्माण होते. लग्नानंतर पुरुषांनी कोणच्या चुका करु नये, जाणून घ्या
चाणक्याच्या म्हणण्यानुसार, जो पुरुष आपल्या पत्नीचा आदर करत नाही त्या व्यक्तींच्या जीवनात कधीही सुख आणि शांती असू शकत नाही. पत्नी ही केवळ जीवनसाथीच नाही तर ती घराच्या संपत्तीची देवी देखील आहे. जर तुम्ही तिचा अनादर केला तर घरातील वातावरण बिघडेल आणि नात्यांमध्ये अंतर वाढेल. इतरांसमोर पत्नीची चेष्टा करणे किंवा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक आहे.
चाणक्यांच्या मते, तुलना नेहमीच न्यूनगंड आणि संताप निर्माण करते. जर तुम्ही तुमच्या पत्नीची तुलना इतर कोणत्याही स्त्रीशी केली, मग ती तिची बहीण असो, शेजारी असो किंवा चित्रपट अभिनेत्री असो, तर त्यामुळे तिचा स्वाभिमान दुखावतो. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे खास गुण असतात आणि पत्नीचे गुण समजून घेतले पाहिजेत आणि त्या गुणांची कदर केली पाहिजे.
लग्नानंतर एक गोष्ट महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे गुप्तता. चाणक्याच्या मते, घरातील गोष्टी, विशेषतः पत्नीशी संबंधित गोष्टी, मित्रांना, नातेवाईकांना किंवा पालकांना सांगणे खूप हानिकारक असू शकते. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या पत्नीला अस्वस्थ वाटू शकते. घरातील समस्यांचे निराकरण घरातच शोधले पाहिजे.
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहवास आणि संवाद. जर लग्नानंतर पुरूष आपल्या पत्नीला वेळ देत नसेल आणि तिचे ऐकत नसेल तर हळूहळू नात्यात दुरावा निर्माण होतो. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दिवसातील काही वेळ तुमच्या पत्नीसोबत घालवलाच पाहिजे.
रागाच्या भरात केलेला अपमान कधीच विसरला जात नाही. चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखादा पुरूष रागावतो तेव्हा तो आपली बुद्धिमत्ता गमावून बसतो आणि असे शब्द बोलतो जे हृदयाला छेदू शकतात. जर तुम्ही रागाच्या भरात तुमच्या पत्नीला शिवीगाळ केली तर त्याचा परिणाम बराच काळ टिकतो. म्हणून, जर तुम्हाला राग आला तर गप्प राहा, पण कठोर शब्द बोलू नका.
बऱ्याच पुरुषांना असे वाटते की त्यांना सर्व काही माहीत आहे आणि त्यांच्या पत्नीच्या मताची गरज नाही. चाणक्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीची बुद्धिमत्ता, अनुभव आणि भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा तिचा छोटासा सल्ला मोठे नुकसान टाळू शकतो. म्हणून तिचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि ती काय म्हणते याचा विचार करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)