मध्यप्रदेश देवासमधील दुर्गा मातेचे शापित मंदिर
शारदीय नवरात्रीच्या पवित्र सणाला 3 ऑक्टोबर पासून सुरूवात झालेली आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण जो अश्विन महिन्यात साजरा करण्यात येतो. हा सण नऊ दिवसांचा असतो. यावेळी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांत लोक 9 दिवसांचे व्रतही करतात. याशिवाय या 9 दिवसांमध्ये देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमते. आपल्या भारतात दुर्गा मातेची अनेक मंदिरे आहेत. ज्यांचे स्वतःचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
पण तुम्हाला माहित आहे का देवीचे एक असेही मंदिर आहे जे शापित आहे. आज आपण दुर्गा मातेच्या या शापित मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे देवीचे भक्त बाहेरूनच दर्शन घेऊन जातात. आज आपण देवीच्या या मंदिराचे रहस्य जाणून घेणार आहोत. माता दुर्गेच हे मंदिर मध्यप्रदेशात आहे. जिथे सूर्यास्तानंतर कोणीही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात नाही.
सूर्यास्तानंतर कोणीही मंदिरात जात नाही कारण –
मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यात माता दुर्गेचे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये भक्त जाण्यास घाबरतात. या मंदिरात भक्त सकाळी आणि दुपारी बाहेरून देवीचे दर्शन घेतात. मात्र सूर्यास्तानंतर एकही भक्त या मंदिरकडे दर्शन घेण्यासाठी येत नाही. येथील लोकांच्या म्हणण्यानुसार, या मंदिरात सूर्यास्तानंतर गेल्यास विचित्र घटना घडल्याचे सांगितले जाते. येथील लोकांचे म्हणणे आहे की, या मंदिरातून खूप भितीदायक आवाज येतात, कधी मंदिरात सिंहांच्या गर्जना तर कधी अचानक घंटा वाजू लागल्याचा आवाज येतो. असे म्हटले जाते की, जर भक्तया मंदिरात साफ मनाने भेट देण्यास आला तर त्याला कोणताही त्रास होत नाही, मात्र चुकीच्या हेतुने गेल्यास या मंदिरामुळे वाईट परिस्थीती निर्माण होते.
काय आहे या शापित मंदिरामागील कथा
देवासमधील दुर्गा मातेच्या या मंदिराला शापित म्हणण्यामागे एक कथा प्रचलित आहे. देवासमधील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर जिल्ह्याच्या महाराजांनी त्यांच्या दुर्गा मातेवर असलेल्या श्रद्धेमुळे बांधले होते. या मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर राजघराण्यात अशुभ घटना घडू लागल्या. असे म्हटले जाते की, राजाच्या मुलीचे सेनापतीसोबत प्रेमसंबंध होते. राजाला आपल्या मुलीचे सेनापतीसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला आणि मुलीला तुरूंगात टाकले. असे सांगण्यात येते की, राजकन्येचा तुरुंगातच मृत्यू झाला. मृत्यूचे कारण कोणालाही कळाले नाही.
तर राजकन्येच्या मृत्यूची बातमी सेनापतीला कळताच त्याने दुर्गा मातेच्या या मंदिरात आत्महत्या केली होती. असे मानले जाते की, सेनापतीच्या आत्महत्येनंतरच ‘हे’ मंदिर अपवित्र झाल्याचे शाही पुजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर राजाने शाही पुरोहितांच्या सांगण्यावरून मोठ्या गणेश मंदिरात मातेची मूर्ती पूर्ण आदराने स्थापित केली. आणि हे मंदिर बंद करून टाकले. या मंदिरात मूर्ती नसतानाही भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.