
फोटो सौजन्य- गुगल
गुजरातमधील जुनागड येथे असलेला गिरनार पर्वत हा जैन धर्मांतील सर्वांत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानला जातो. येथे असलेले नेमिनाथांचे मंदिर जैन धर्माच्या 22 व्या तीर्थकारांना समर्पित आहे. जैन श्रद्धेनुसार, भगवान नेमिनाथांना याच गिरनार पर्वतावरती केवल ज्ञान प्राप्त झाले आणि याच ठिकाणी त्यांना मोक्ष प्राप्त झाला. त्यामुळे हे स्थान जैनांसाठी मोठं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं.
भगवान नेमिनाथ हे श्रीकृष्णाचे चुलत भाऊ मानले जातात. त्यांचा विवाह राजू हिच्याशी ठरणार होता. विवाहासाठी जात असताना त्यांनी हजारो प्राण्यांना बांधून ठेवलेलं पाहिलं. त्या मुक्या प्राण्यांचा आक्रोश पाहून त्याचं मन व्याकूळ झालं त्यांनी त्याक्षणी संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि वैराग्य स्वीकारलं. पुढे त्यांनी कठोर तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त केलं. जैन परंपरेत ही घटना करुणा आणि अहिंसेचं सर्वोच्च उदाहरण मानले जाते.
इतिहासकारांच्या मते, सध्याच भव्य मंदिर इ.स. 1128 ते 1129 च्या सुमारास सौराष्टाचा राज्यपाल सज्जन यांने बांधलं आहे किंवा त्याची पुर्नबांधणी केली आहे. पुढील अनेक शतकात मंदिरांचा विस्तार आणि जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या इतिहासात अनेक राजे, दाते आणि जैन आचार्यांचा उल्लेख असल्याचेही उल्लेख आढळतात. जैन ग्रंथांमध्ये उल्लेख आहे.
प्राचीन काळी येथील मंदिरात मातीची मूर्ती होती. एका अभिषेकादरम्यान ती मूर्ती विरघळल्याने रत्नसार नावाच्या भक्ताने 21 दिवसांचा उपवास केला. त्यानंतर देवी अंबिकेने त्याला नेमिनाथांची दगडी मूर्ती दिली आणि ती येथे प्रतिष्ठापित करण्यात आली ही कथा आजही भाविकांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते.
हे मंदिर मारू-गुर्जरा शैलीत बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या दगडातील भगवान नेमिनाथांची भव्य मूर्ती विराजमान आहे. मंदिराभोवती अनेक लहान देवकुलिका, कोरीव खांब, मंडप आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. दगडी शिल्पकला आणि सुक्ष्म नक्षीकाम पाहून प्राचीन भारतीय स्थापत्यशैलीची उत्कृष्टता इथे अनुभवता येते.
गिरनार पर्वतावरील मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी हजारो पायऱ्या चढाव्या लागतात. ही यात्रा शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असली तरी भाविकांसाठी धार्मिक ती आध्यात्मिक साधना मानली जाते. पर्वतांवरून दिसणारे निसर्गसौंदर्य आणि मंदिर परिसरातील शांतता मनाला वेगळाच अनुभव देतात.
जैन धर्मात अशी मान्यता आहे की हा गिरनार पर्वत केवळ एक तीर्थक्षेत्र नसून ती मोक्क्षभुमी आहे त्यामुळे येथे दर्शन, तप आणि पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्ती होते. दरवर्षी हजारो जैन भाविक गिरनार यात्रा करून नेमिनाथाचं दर्शन आवश्यक घेतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान नेमिनाथांचे प्रसिद्ध मंदिर गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वतावर आहे.
Ans: जैन श्रद्धेनुसार भगवान नेमिनाथांना गिरनार पर्वतावर केवलज्ञान प्राप्त झाले आणि याच ठिकाणी त्यांना मोक्ष मिळाला. त्यामुळे गिरनारला महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र मानले जाते.
Ans: मंदिराची वास्तुरचना मारू-गुर्जरा स्थापत्यशैलीशी संबंधित आहे. मंदिरात कोरीव खांब, मंडप, देवकुलिका आणि सुंदर दगडी नक्षीकाम पाहायला मिळते.