फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी कामिका एकादशीचे व्रत पाळले जाते. यावेळी एकादशीचे व्रत सोमवार, 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे. यावेळी काही शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना या योगाचा विशेष फायदा होणार आहे.
कामिका एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 20 जुलै रोजी दुपारी 12.14 वाजता होईल आणि या तिथीची समाप्ती 22 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी होईल. मात्र उद्यतिथीनुसार हे व्रत 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे. या वेळी रोहिणी नक्षत्र राहणार आहे. तसेच वृद्धी योग देखील तयार होत आहे. त्यासोबतच चंद्र वृषभ राशीमध्ये राहणार आहे. त्यामुळे कामिका एकादशीचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे.
सर्व नक्षत्रांपैकी रोहिणी नक्षत्र हे अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते. हे 27 नक्षत्रांपैकी एक आहे. रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याचे देवता ब्रह्मा आहे. या नक्षत्राला सौंदर्य, सर्जनशीलता आणि भौतिक सुखांचे कारक मानले जाते. या योगामुळे व्यक्तीला भौतिक सुखाचा लाभ होतो असे म्हटले जाते.
वृद्धी योग हा एक शुभ योग मानला जातो. या योगामध्ये व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश येण्यास मदत होते. श्रावण महिन्यात रोहिणी नक्षत्र आणि वृद्धी योगाचे होणारे शुभ संयोजन फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करणे फायदेशीर ठरेल. या दिवशी या 5 राशींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशी खूप खास असणार आहे. एकादशीच्या दिवशी तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत तुम्हाला मिळू शकतात.
कर्क राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. या राशीच्या लोकांच्या जुन्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. कर्क राशीच्या असे काही उपाय केल्यास यश मिळू शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशीचे व्रत फायदेशीर राहील. या लोकांच्या जीवनात असलेल्या समस्या संपू शकतात, भगवान विष्णूंचा आशीर्वाद या लोकांवर कायम राहील. तसेच आर्थिक स्थिती सुधारू शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांना कामिका एकादशीचे व्रत फायदेशीर ठरणारे आहे. कारण या व्रतामुळे तुमच्या जीवनातील प्रेमसंबंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते. तसेच एखाद्या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
मीन राशीच्या लोकांना कामिका एकादशीच्या शुभ योगामुळे अनेक प्रगतीचे संकेत मिळू शकतात. या लोकांचा जुन्या मित्रांशी संपर्क साधून त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)