फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तसेच भक्त नऊ दिवस उपवास देखील करतात. हा दिवस देवी दुर्गेला समर्पित आहे. असे मानले जाते की या नऊ दिवसांत देवीला तिच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवल्याने ती प्रसन्न होते, असे म्हटले जाते. तसेच ती भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते असे देखील म्हटले जाते. यंदा सोमवार, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. या दिवशी देवी हतीवर स्वार होऊन येणार आहे. तर देवी दुर्गा मानवी स्वारीवर म्हणजेच पालखीवर निघतील. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा, जाणून घ्या
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करुन तिला गाईचे तूप अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे राग आणि दुःख दूर होतात, अशी देखील मान्यता आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा झाल्यानंतर मिश्री अर्पण केले जाते. यामुळे कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी चंद्रघटा देवीला खीर अर्पण केली जाते. असे केल्याने मानसिक शांती मिळते आणि सर्व संकटे दूर होतात, असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीला मालपुआ अर्पण करावा. यामुळे देवी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात, असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला केळी अर्पण केले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायानी देवीला मध अर्पण करावे. यामुळे भक्ताची आकर्षण शक्ती वाढते आणि नातेसंबंध गोड होतात.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. यावेळी देवीला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तीची भीतीपासून सुटका मिळते.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीला पूजा झाल्यानंतर नारळ अर्पण करावे, असे करणे शुभ मानले जाते. यामुळे मुलांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा झाल्यानंतर तीळ अर्पण करावे. ही गोष्ट अर्पण केल्यामुळे अचानक येणाऱ्या आपत्तींपासून संरक्षण मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)