
स्वामी समर्थांचे लाखो करोडो भक्त आहेत जे स्वामींना आई किंवा गुरु माऊली असं म्हणतात. स्वामींनी दिलेल्या विचारांचं विवेकाचं पालन प्रत्येक स्वामीभक्त ज्याच्या त्याच्या परीने करत असतो. श्री स्वामी समर्थ हा मंत्र आणि त्याबरोबर असलेला तारकमंत्र याचं पठण न करताना किंवा तारकमंत्र माहित नसेल असा एकही जण नाही. असं म्हणतात की, स्वामींनी सांगितलं होतं की, त्यांनी दिलेला तारकमंत्र हा कायम त्यांच्या भक्तांना आव्हानं आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. स्वामी म्हणाले होते तारक मंत्राचं पठण करणाऱ्यांचं आणि त्याची पुजणाऱ्यांबरोबर स्वामी कायम सोबत आहेत. स्वामींचा तारकमंत्र हा भक्तांना मानसिक आधार आलेल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ देतो. या तारकमंत्रात एक शब्द आहे तो म्हणजे स्मरणगामी.
तारकमंत्रात एक ओळ आहे,
“अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी”
त्याचबरोबर स्वामींच्या मानसपुजेतही हा शब्द आढळतो. “स्वामी समर्था तुम्ही स्मरणतृगामी, हृदयासनी या बसा प्रार्थितो मी” . स्वामी समर्थांना ‘स्मरणगामी’ किंवा ‘स्मर्तृगामी’ असं म्हटलं आहे. या शब्दाचा नेमका अर्थ असा की, स्मरण करताच भक्तांच्या मदतीला धावून येणारा देव. स्वामी समर्थांना ‘स्मरणगामी’ किंवा ‘स्मर्तृगामी’ म्हणतात कारण ते स्मरण करताच भक्तांच्या मदतीला धावून येतात, अगदी संकट येण्यापूर्वीच ते मदतीसाठी उभे राहतात असे मानले जाते. त्यांच्या नावाचा अर्थ ‘स्मरण करताच समोर येणारे’ असा आहे. ‘स्मरण’ म्हणजे आठवण आणि ‘गामी’ म्हणजे जाणे किंवा येणे, यावरून ‘स्मरणगामी’ या शब्दाचा अर्थ होतो की आठवण काढताच ते उपस्थित होतात.
स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांच्या जीवनकार्याचं वैशिष्ट्य म्हणजे भक्तांच्या अंतःकरणातील भाव ओळखून त्यांना तात्काळ प्रतिसाद देणं. म्हणूनच जगभरातील भक्त त्यांना “स्मरणगामी” किंवा “स्मर्तृगामी” म्हणून ओळखतात. म्हणजे भक्ताने जरी मनोमन स्मरण केलं तरी ते क्षणात त्याच्या जवळ येतात. स्वामी समर्थांची कृपा काळ, देश आणि परिस्थिती यापलीकडची आहे. अनेक भक्तांच्या चरित्रांत असंख्य उदाहरणं आढळतात. हेच त्यांच्या “स्मरणगामी” स्वरूपाचं दैवी चिन्ह आहे.“स्मरणगामी” हा शब्द भक्तीचा सर्वोच्च अर्थ सांगतो तो असा की, देव दूर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. फक्त भावपूर्वक स्मरण हाच त्याच्याशी जोडणारा पूल आहे. स्वामी समर्थ हे नामस्मरणाचं सामर्थ्य दाखवून देणारे संत होते. त्यांनी सांगितलं की, मोठे यज्ञ-व्रत करण्याची गरज नाही तर मनापासून हाक मारल्यावर स्वामींचं असणं त्यांच्या भक्तांना जाणवतं. श्री स्वामी समर्थ फक्त हे एवढं जरी मनापासून म्हटलं तरी स्वामी त्यांच्या भक्तांना कधीही दूर करत नाहीत.