“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या नामाची गोडी प्रत्येक दत्तसंप्रदायातील भक्ताला लागलेली असते. देशभरात दत्तसंप्रदाय आणि दत्तगुरुंना मानणारा भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ आणि श्रीस्वामी समर्थ हे सगळेच दत्तगुरुंचे अवतार मानले जातात. दत्तसंप्रदायाचं वैशिष्ट्यं म्हणजे भाविक श्रद्धेने सेवा करतात मात्र विज्ञानाला अनुसरुन या सेवा केल्या जातात. श्रीगुरुदेव दत्त म्हणजे दत्तात्रय हे त्रिदेवांचा अवतार मानले जातात. त्यांचे दर्शन घेताना त्यांच्या सोबत श्वान आणि गाय ही प्रतिमा नेहमी दिसते. या प्रतिमांना अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. यामागचा नेमका अर्थ काय, चला तर मग जाणून घेऊयात.
दत्तगुरुंची प्रतिमा म्हटली की, त्यांच्या बरोबर श्वान आणि गाय असते. या श्वास आणि गाय असण्यामागे देखील मोठा खोल अर्थ आहे.
गाय ही भारतीय संस्कृतीत “कामधेनू” मानली जाते. ती पालनपोषण, मातृत्व, शांती आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. दत्तगुरुंच्या प्रतिमेत दिसणारी गाय म्हणजे धरणीचं प्रतीक. गाय ही सर्व जीवांना पोषण देणारी माता आहे. दत्तगुरु हे करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत. म्हणूनच त्यांच्या सोबत गाय दाखवली जाते, जी सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करते. हिंदू संस्कृती ही विज्ञानावर आधारित आहे. अध्यात्म पंचमहाभूतांना कायमच महत्व देतं. दत्तगुरुंच्या फोटोमध्ये त्यांच्या बरोबर असलेली गाय म्हणजे पृथ्वीचा अंश मानला जातो. ज्या प्रमाणे पृथ्वी सर्व जीवांचा भार वाहते तेच मातृत्व गायीमध्ये देखील असतं आणि म्हणूनच दत्तगुरुंच्या फोटोत गाय देखील असते.
दत्तगुरुंच्या प्रतिमेत दिसणारे चार श्वान हे चार वेदांचं प्रतीक म्हटलं जातं. ते वेद म्हणजे – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. श्वान हे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जागरूकतेचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की, श्वान हा आपल्या स्वामीप्रति कायमच निष्ठावान आणि विश्वासू असतो. ज्याने आपलं पालन पोषण केलं त्या स्वामीशी प्रामाणिक राहणं श्वानाचं गुण वैशिष्ट्यं आहे. निसर्गातील विविध घटक आणि प्राणीमात्रे आपल्याला हेच शिकवतात की, प्रेम, दया, निष्ठा या माणसाने आत्मसात करायला हवं. श्वानाप्रमाणेच आपण देखील आपल्या गुुरुंवर विश्वास ठेवावा, हाच संदेश यातून दिला जातो.दत्तगुरु कायमच जीवनाचा सार निसर्गाच्या विविध रुपांमधून सांगतात. अधात्म आणि विज्ञानाची सांगड ही दत्तसंप्रदायात दिसून येते.
Shree Swami Samarth : विटाळ की पवित्र ? महिलांच्या मासिक पाळीबाबत स्वामी समर्थांचे विचार काय होते ?