
श्री क्षेत्र गाणगापूर ही दत्तगुरुंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत पावित्र्य इतकं की भूत प्रेताची बाधा झालेली माणसं इथून बरी होऊन गेली आहेत. गाणगापूरात दत्तगुरुंचं सत्व आहे. ज्यामुळे या जागेला एक गूढ आणि अलौकिक शक्तीचे स्थान मानले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की, इथे रोज दुपारी दारी आलेल्या याचकाला भिक्षा द्यायलाचं हवी. कारण दत्तगुरु कोणाच्याही रुपात माधुकरी स्विकारण्यासाठी येत असतात. माधुकरी हा दत्तसंप्रदायतील महत्वाचा असा भाग आहे.
ज्या प्रमाणे मधमाशी प्रत्येक फुलातून थोडं थोडं मध गोळा करते. त्याप्रमाणे पाच घरांमधून थोडी थोडी भिक्षा मागून जो आहार घेतला जातो त्याला माधुकरी म्हणतात. दत्तसंप्रदायात माधुकरीला प्रचंड महत्व आहे. असं म्हटलं जातं की, यामुळे मानवाच्या अहंकाराचा नाश होतो. गाणगापूर हे नृसिंह सरस्वती महाराजांचं कर्मस्थान मानलं जातं. नृसिंह सरस्वती यांनी अध्यात्मिक मार्गाने जीवनाचा मुलमंत्र सांगितला. माणसाने प्रपंच करताना कृतज्ञता,सेवाभाव कधीही सोडू नये माणसाला माणूस म्हणून वागवावं. गरजवंताला मदत करावी, सेवाभाव हीच इश्वरसेवा आहे हे पटवून दिलं.
नृसिंह सरस्वती महाराजांचं गाणगापूरातील अवतारकार्य संपल्यावर ते शैल पर्वताकडे रवाना होत होते, त्यावेळी त्यांना निरोप देताना त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. भक्तांचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून नृसिंह सरस्वती यांनी भक्तांनी वचन दिलं की, मी रोज या गाणगापूरात माधुकरी मागायला येत जाईल, मला तुम्ही इतरत्र कुठेही शोधू नका तर मला ओळखा, असं नृसिंह सरस्वती यांनी भक्तांना सांगितलं, असं गावकरी म्हणतात. याच कारणामुळे आजंही इथे माधुकरी प्रथा अखंडित आहे.
गावकऱ्यांची आजही असा विश्वास आहे की, दत्तगुरुंचा अवतार असलेले नृसिंह सरस्वती महाराज कधी लहान मुलाच्या तर कधी वृद्ध व्यक्तीच्या रुपात माधुकरी मागयला येतात. त्यामुळे या ठिकाणी आलेला कोणताही याचक जो भिक्षा मागतो तो कधीच रिकाम्या हाती जात नाही. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच गाणगापूरातील भाविक याचकाच्या रुपात दत्तगुरु दारी आलेअसावेत या उद्देशाने याचकाचा रिकाम्या हाती कधीच जाऊ देत नाही. आजवर येणाऱ्य़ा कोणत्याही याचकाचा इथे कधीच अपमान झालेला नाही. गाणगापूरचं हे वेगळेपण कायमच इथल्या गावकऱ्य़ांनी जपलं आहे. आजही या ठिकाणी दत्तगुरुंचा वास असल्याचं जाणवतं. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !