फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुहासिनीने पतीसोबत वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते, असे म्हटले जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान असते असे म्हटले जाते म्हणून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने तिन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. यामुळे महिलांना सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद लाभतो, असे म्हटले जाते. हे व्रत पाळल्याने नात्यांमधील प्रेम, सुसंवाद आणि विश्वास दृढ होतो. असे देखील म्हटले जाते की, दाम्पत्यांने एकत्र परिक्रमा केल्याने परस्परांमधील समजूतदारपणा वाढतो तसेच वैवाहिक जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर होण्यास मदत होते.
पौराणिक मान्यतेनुसार, वडाच्या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात येणारी कोणत्याही प्रकारची अडीअडचणी, आर्थिक समस्या या वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये केल्यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते.
पंचांगानुसार, वटपौर्णिमेच्या तिथीची सुरुवात मंगळवार, 10 जून रोजी 11.35 वाजता सुरु होईल आणि त्याची समाप्ती बुधवार, 11 जून रोजी दुपारी 1.13 वाजता होईल. अशा परिस्थितीत वटपौर्णिमेचे व्रत मंगळवार, 10 जून रोजी पाळले जाणार आहे.
रुद्राभिषेकाची पूजा ही प्रामुख्याने भगवान शिवाची पूजा मानली जाते. मात्र, वट पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा व्रताच्या दिवशी पतीसोबत काही खास उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.
या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगांचे वस्त्र परिधान करावे. तसेच सोळा श्रृंगार परिधान करावे.
त्यानंतर वडाची पूजा करायला जाताना पूजेच्या ताटामध्ये रोळी, तांदूळ, फुले, दिवा, धूप, अगरबत्ती, फळं, मिठाई, कच्चा धागा इत्यादी वस्तू सोबत घ्याव्यात.
वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्याच्या मुळाशी पाणी ओता. वडाच्या झाडाची पूजा करताना ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे ध्यान करावे.
अगरबत्ती, दिवा लावून झाल्यानंतर रोळी, तांदूळ, फुले इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात.
वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारताना कच्चा धागा गुंडाळा. परिक्रमा या 7, 11, 21 किंवा 108 अशा प्रकारच्या असू शकतात. मात्र, 108 परिक्रमा मारणे फलदायी मानले जाते.
प्रत्येक परिक्रमा पूर्ण करताना तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम सुखी जीवन आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. यावेळी “अवैध्व्यं च सौभागं पुत्रपौत्रादी वर्धानम्। देही देवी महाभागे वटसावित्री नमोस्तुते।” या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे “ओम नमो भगवते वासुदेवाय” किंवा “ओम नमः शिवाय” या मंत्रांचा देखील जप करता येतो.
परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर वडाच्या झाडाखाली बसून सत्यवानाची कथा वाचा किंवा ऐका. त्यामुळे या पूजेचे पूर्ण फळं मिळते असे म्हटले जाते.
पूजा झाल्यानंतर शेवटी वडाच्या झाडाची आरती करा. त्यानंतर तेथील उपस्थित सुहासिनी महिलांना वस्तू आणि फळे यांचे वाण द्या.
वडाची पूजा करुन घरी आल्यानंतर सर्वांना हा प्रसाद वाटा. सूर्यास्तानंतर उपवास सोडा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)