26/11 mastermind Rana's demand was met by security forces
नवी दिल्ली – 26/11 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका बजावणारा तहव्वूर हुसेन राणा भारतात दाखल झाल्यानंतर एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) ताब्यात आहे. सध्या त्याला दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील उच्च सुरक्षा विभागात ठेवण्यात आले आहे. मात्र, त्याने केलेल्या तीन ‘साध्या’ मागण्यांनीही तपास संस्थांना सतर्क केलं आहे. हे मागणं फक्त कुराण, पेन आणि कागदाचं असलं, तरी यामागे धार्मिक मुखवट्याच्या आड लपलेली रणनीती असल्याचा संशय आहे. एनआयएचे अधिकारी राणाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
एनआयएने तहव्वूर राणाची दुसऱ्या दिवशीही तासन्तास चौकशी केली. चौकशीत त्याने स्पष्टपणे कोणतेही विशेष गोष्टी न मागता, तीन गोष्टींची मागणी केली, कुराण, पेन आणि कागद. ही मागणी पाहता प्रथमदर्शनी ती धार्मिक वाटू शकते. पण एनआयए सूत्रांनुसार, राणा सतत पाच वेळा नमाज पढतो, कुराण वाचतो आणि पेनने काहीतरी लिहित राहतो. यामुळे त्याच्या हातून लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाची स्कॅनिंग केली जात आहे. काही गुप्त कोड किंवा संकेतशब्द त्यात लपलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : लालमोनिरहाट एअरफील्डवर चीनची नजर; भारतासाठी धोरणात्मक इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क
वय: 64 वर्षे
नागरिकत्व: कॅनेडियन, मूळ पाकिस्तानचा रहिवासी
भूमिका: 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार, डेव्हिड हेडलीचा जवळचा
राणाची आणि डेव्हिड हेडलीची जोडी 2006 ते 2008 दरम्यान भारतात लष्कर-ए-तोयबा साठी माहिती गोळा करत होती. हेडलीने आपला ‘व्यावसायिक’ मुखवटा लावत मुंबईत विविध ठिकाणी रेक्की केली. याच माहितीचा वापर करून 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि 166 लोकांचा बळी गेला. 2011 मध्ये अमेरिका सरकारने हेडलीला दोषी ठरवले आणि राणाला अटक करण्यात आली. भारताने 2020 मध्ये राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आणि अखेर 10 एप्रिल 2025 रोजी त्याचे प्रत्यार्पण भारतात झाले.
एनआयए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, राणा ‘शांत आणि धार्मिक’ वाटतो. परंतु, सुरक्षा यंत्रणा याला नवा कट रचण्याचा भाग मानत आहे. त्याच्या मागण्यांवरून काही निष्पाप दिसणारे संकेत देखील धोकादायक संकेत बनू शकतात, असा धोका वर्तवला जात आहे. एनआयएने यापूर्वी 20 हून अधिक प्रश्न विचारले आहेत, ज्यामध्ये दुबईत झालेल्या संशयास्पद बैठका, भारतातील त्याच्या भेटींचा उद्देश, आणि डेव्हिड हेडलीसोबत असलेला संपर्क या गोष्टींचा समावेश होता.
राणावर २४x७ कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवली जाते. त्याच्या वैद्यकीय, कायदेशीर तपासण्या दर ४८ तासांनी केल्या जात आहेत. त्याच्या चौकशीतील प्रत्येक उत्तर, वागणूक आणि हातातील लेखन यावर अत्यंत बारकाईने लक्ष दिलं जात आहे. एनआयएच्या दृष्टीने ही केवळ चौकशी नाही, तर संभाव्य भविष्यातील दहशतवादी कारवायांना रोखण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. राणा सध्या काही लिहित असला तरी, ते प्रार्थनेचे शब्द आहेत की आगामी हल्ल्याचा संकेत, हे शोधणे ही आता प्राथमिकता बनली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळमधील बीरगंजमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक, तणावग्रस्त परिस्थिती; संपूर्ण शहरात कर्फ्यू लागू
तहव्वूर राणाने मागितलेल्या तीन गोष्टी, कुराण, पेन आणि कागद, या दिसायला साध्या असल्या, तरी त्यांचा उद्देश किती खोलवरचा आहे हे आगामी तपासातून स्पष्ट होईल. हे पश्चात्तापाचे अश्रू आहेत की नव्या कटाचे बीज? एनआयएची तपासणी पुढील काही दिवसांत याचे उत्तर देशासमोर आणेल.