Lalmonirhat airfield controversy : भारताच्या पूर्वोत्तर सीमेलगत असलेल्या बांगलादेशातील लालमोनिरहाट एअरफील्डवर चीनच्या वाढत्या हालचालींमुळे भारतीय सुरक्षायंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे. या विमानतळाचा वापर लष्करी हेतूसाठी झाला, तर सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतासाठी धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा सुरक्षा विश्लेषकांनी दिला आहे.
लालमोनिरहाट हे बांगलादेशच्या वायव्य सीमेवर, ‘चिकन नेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या अरुंद भूभागाच्या अगदी जवळ आहे. ही भौगोलिक रचना भारतासाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. त्यामुळे या परिसरात चीनचा संभाव्य लष्करी हस्तक्षेप हा भारतासाठी मोठा धोरणात्मक धक्का ठरू शकतो.
चिनी शिष्टमंडळाच्या भेटीमागे रणनीतीचा भाग
मे महिन्यात चीनचे वाणिज्य मंत्री वांग वेंटाओ यांच्या नेतृत्वाखालील एक मोठे चिनी शिष्टमंडळ बांगलादेशच्या राजधानी ढाका येथे भेट देणार आहे. ही भेट वरवर पाहता व्यावसायिक चर्चेसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यामागे चीनची खोलवर रणनीती लपलेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जपानी दणक्याने ट्रम्पची तंतरली; बाँडची विक्री सुरू झाल्याचे कळताच टॅरिफच्या अंमलबजावणीला ब्रेक
मिळालेल्या माहितीनुसार, चीन बांगलादेशातील लालमोनिरहाट विमानतळावर गुंतवणुकीची योजना आखत आहे. हे एअरफील्ड एकेकाळी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लष्करी हवाई तळ होते आणि 1931 मध्ये ब्रिटिशांनी लष्करी हेतूसाठीच याची निर्मिती केली होती. सध्या ते बांगलादेशी हवाई दलाच्या 9 तळांपैकी एक मानले जाते.
दुहेरी वापराचा धोका, नागरी चेहऱ्याआड लष्करी वापर
या विमानतळावर चीन गुंतवणूक करत असल्यास, तो ‘दुहेरी वापराचा’ एअरबेस होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, वरवर नागरी विमान वाहतूक चालवली जाईल, पण प्रत्यक्षात ते लष्करी उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि टेहळणीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनू शकते. हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकते, असे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या विमानतळावरून थेट भारतीय हवाई क्षेत्रावर नजर ठेवणे शक्य होईल, तसेच तात्काळ लष्करी हालचाली करणेही शक्य होईल. अशा प्रकारे चीन भारताच्या ‘चिकन नेक’ भूभागावर ताण निर्माण करून, भारताच्या पूर्वोत्तर राज्यांना इतर भागांपासून अलग करण्याची क्षमता प्राप्त करू शकतो.
बांगलादेशची भूमिका आणि भारताची चिंता
बांगलादेशचे अंतरिम सरकार सध्या चीनच्या प्रस्तावांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून येते. अलिकडेच मुहम्मद युनूस यांनी बीजिंगला भेट दिल्यानंतर बांगलादेशने चीनला थेट गुंतवणुकीसाठी आमंत्रण दिले आहे. ही बाब भारतासाठी अधिक चिंताजनक आहे. भारत आणि बांगलादेशमधील तिस्ता पाणी वाद अद्याप प्रलंबित आहे, अशा वेळी लालमोनिरहाटमधून चीनचा प्रभाव वाढल्यास, भारताला भू-राजकीय पातळीवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे भारताच्या शेजारील देशांतील वाढत्या चिनी उपस्थितीबद्दलची चिंता आणखी तीव्र झाली आहे.
भारत सज्जतेच्या दिशेने
या पार्श्वभूमीवर भारताच्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांनी संबंधित भागात हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. चीनच्या हालचालींना योग्य प्रतिसाद देण्यासाठी आणि भारतीय सीमावर्ती भाग सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण मंत्रालय पावले उचलत आहे. लालमोनिरहाट एअरफील्डवरील चीनची वाढती रुजवात केवळ बांगलादेशापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती समस्त दक्षिण आशियाई सामरिक साखळीवर प्रभाव टाकणारी ठरू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताने डाव टाकला, बांगलादेशची केली गळचेपी; आर्थिक नुकसान अनिवार्य
चीनचा डावगिरी खेळ, भारताची कसोटी
लालमोनिरहाटवरून चीनचा धोरणात्मक डावगिरीचा खेळ भारतासाठी नवा धोका निर्माण करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने नुसती चिंता न करता ठोस सामरिक आणि राजनैतिक पावले उचलण्याची गरज आहे. चीनच्या प्रबळ आर्थिक-राजकीय प्रभावाला तोंड देताना, भारताला आपल्या शेजारील संबंधांचे नव्याने पुनर्मूल्यांकन करावे लागेल.