पुणे/वैष्णवी सुळके: रस्त्याच्या कडेला उपेक्षितपणे जगणाऱ्या, समाजाच्या नजरेआड गेलेल्या वृद्ध, अपंग आणि अंध भिक्षेकऱ्यांच्या जीवनात सन्मानाने जगण्याची नवी आशा ‘मध्यरात्रीचे सूर्य’ या उपक्रमातून निर्माण झाली आहे. पुण्यातील सोहम ट्रस्ट आणि डॉक्टर्स फॉर बेगर्स या संस्थांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या या उपक्रमाने सामाजिक आणि पर्यावरणपूरक परिवर्तनाची चळवळच उभी केली आहे.
डॉ. अभिजीत आणि डॉ. मनीषा सोनवणे या डॉक्टर दांपत्याने सुरु केलेल्या या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय मदत, पुनर्वसन, प्रशिक्षण आणि रोजगार देणे हे आहे. या उपक्रमांतर्गत रस्त्यावर राहणाऱ्या निराधार व्यक्तींची निवड करून, त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना स्वच्छता, व्यसनमुक्ती, सुसंस्कार आणि कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाते.
या केंद्रात पर्यावरणपूरक उत्पादने तयार केली जातात. धार्मिक स्थळांमधील फुलांचे निर्माल्य गोळा करून त्यापासून नैसर्गिक रंगपावडर तयार केली जाते. ही पावडर अगरबत्ती, धूप, मलम आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाते. याशिवाय, मोत्यांपासून तयार केले जाणारे शोभिवंत बुके हे दीर्घकाळ टिकणारे असून पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ओळखले जात आहेत. तसेच लिक्विड वॉश आणि क्लीनिंग प्रॉडक्ट्स तयार करण्याचं कामही इथल्या लोकांकडून केलं जातं.
या उपक्रमातील एक वेगळेपण म्हणजे जुन्या कपड्यांपासून तयार केले जाणाऱ्या कापडी पिशव्या. प्लास्टिक बंदीला साथ देणाऱ्या या पिशव्या विकण्याची संधी अंध आणि अपंग व्यक्तींना दिली जाते. रोजगार मिळवून या व्यक्तींना केवळ आर्थिक मदतच मिळत नाही, तर आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळते.
या सगळ्या प्रक्रियेत माणूसपणाची जाणीव जपली जाते. या केंद्रावर रोज सकाळी प्रार्थना होते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावाने हाक मारली जाते. त्यांच्या वाढदिवशी केक कापला जातो. तेथील वृद्ध, दिव्यांग व्यक्तिंवर हे दाम्पत्य मोफत उपचार करतात. तसेच दैनंदिन वेतनाशिवाय दोन वेळचे जेवण आणि अल्पोपाहार दिला जातो.
या उपक्रमामुळे नद्यांमध्ये निर्माल्य फेकण्याचे प्रमाण घटले आहे आणि अशुद्ध फुलांच्या पुर्नवापरामुळे पर्यावरणास मदत मिळते आहे. यातून भिक्षेचा व्यवहार थांबतो आणि कष्टाने मिळालेल्या पैशातून जीवन जगण्याचा आत्मसन्मान लाभतो. म्हणजेच, या पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून माणूसही वाचतो आणि निसर्गही.
डॉ. अभिजीत आणि डॉ. मनीषा सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेला “मध्यरात्रीचे सूर्य” हा प्रकल्प, म्हणजे फक्त एका प्रशिक्षण व रोजगार केंद्राची सुरुवात नाही, तर समाजाला एक नवा दृष्टिकोन देणारी चळवळ आहे. हा उपक्रम म्हणजे अंधारात हरवलेल्या आयुष्यांमध्ये मानवतेचा आणि आशेचा सूर्य उगवण्याचा एक अविरत प्रयत्न आहे. जो सांगतो की माणूस कुठल्या ही परिस्थितीत असो, त्याला जर प्रेम, संधी आणि थोडा हात दिला, तर तोही आपलं आयुष्य तेजाने उजळवू शकतो.
आपण अशी मदत करु शकता
१. आर्थिक (श्रमिकांचे मानधन, जेवण, कच्च्यामालासाठी)
२. धार्मिक स्थळांवरील निर्माल्य एकत्र करुन देऊ शकता
३. पिशव्या शिवण्यासाठी कापड ( चादर, साडी, ओढणी )
४. जास्त दिवस टिकतील असे खाद्यपदार्थ
५. आपणास नको असलेली, परंतु श्रमिक लोकांना उपयोगी पडेल अशी वस्तू
ही माणसं रस्त्यावर आहेत, माणुसकीनं टाकलेली, पण त्यांचं मन अजूनही माणुसकीच्याच आशेवर टिकून आहे. त्यांना दया नको, भीक नको, संधी हवी आहे कामाची, सन्मानाची, आणि माणूस म्हणून जगण्याची! “मध्यरात्रीचे सूर्य” या प्रकल्पातून आम्ही ती संधी देतोय. पण ही वाट आपण सगळ्यांनी मिळून चालायची आहे. तुमचा थोडासा हातभार, या माणसांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. कारण सगळ्यांसाठी पहाट होतेच असं नाही…काहींसाठी पहाट निर्माण करावी लागते. चला कोणाच्यातरी आयुष्यात पहाट आणूया…!
– डॉक्टर फॉर बेगर्स, डॉ. अभिजीत सोनवणे