
मानवाने विज्ञानाच्या जोरावर अंतराळातील अनेक मोठे टप्पे पार केले आहेत. पृथ्वीभोवती फिरणारे सॅटेलाईट्स, चंद्रावरील ठेवलेले पाऊल आणि मंगळावरील मोहिमा याबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण तुम्हाला माहित आहे का, की मानवाने तयार केलेली अशी कोणती वस्तू आहे जी सध्या पृथ्वीपासून सर्वात जास्त दूर अंतरावर आहे? ती वस्तू म्हणजेच अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा‘ ने लॉंच केलेले ‘व्हॉयेजर-१’ हे अंतराळयान होय.
मोहिमेची सुरुवात आणि प्रवास
‘व्हॉयेजर-१’ हे अंतराळयान ५ सप्टेंबर १९७७ रोजी अवकाशात सोडण्यात आले होते. सुरुवातीला गुरु आणि शनी या ग्रहांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हे काम चोख बजावल्यानंतर या यानाने आपला प्रवास पुढेच चालू ठेवला. आज जवळपास ४९ वर्षांनंतरही हे यान अवकाशात सतत पुढे जात आहे.
सध्या व्हॉयेजर-१ आपल्या पृथ्वीपासून अंदाजे २५ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त दूर गेले आहे. शास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचे तर, हे यान १६५ पेक्षा जास्त खगोलशास्त्रीय एकक अंतरावर आहे. (१ म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांमधील अंतर).
आंतरतारकीय अवकाशात प्रवेश ( Interstellar Space)
वर्ष २०१२ मध्ये ‘व्हॉयेजर-‘ ने एक नवा इतिहास रचला. आपल्या सूर्याचा प्रभाव ज्या क्षेत्रापर्यंत राहतो, त्याला ‘हेलिओस्फिअर’ म्हणतात. हे यान हेलिओस्फिअर ओलांडून ‘आंतरतारकीय अवकाश’ म्हणजेच दोन ताऱ्यांमधील मोकळ्या जागेत प्रवेश करणारे पहिले मानवनिर्मित वाहन ठरले. सध्या ते ताशी तब्बल ६१,००० किलोमीटर या अवाढव्य वेगाने विश्वाच्या अनंत अंधारात प्रवास करत आहे.
पृथ्वीशी संपर्क आणि ‘गोल्डन रेकॉर्ड‘
एवढ्या दूर असूनही व्हॉयेजर-१ अजूनही पृथ्वीवरील नासाच्या ‘डीप स्पेस नेटवर्क’शी संपर्क साधून डेटा पाठवत आहे. तिथून प्रकाश वेगाने निघालेला रेडिओ संदेश पृथ्वीपर्यंत पोहोचायला २२ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. या यानामध्ये एक ‘गोल्डन रेकॉर्ड’ (तांब्याची सोन्याचा मुलामा दिलेली तबकडी) ठेवण्यात आली आहे. जर भविष्यात कधी परग्रहवासीयांना हे यान सापडले, तर त्यांना मानवी संस्कृतीची माहिती मिळावी म्हणून त्यात पृथ्वीवरील विविध भाषांमधील शुभेच्छा संदेश, निसर्गाचे आवाज आणि संगीत रेकॉर्ड केलेले आहे.
व्हॉयेजर- ची ऊर्जा आता हळूहळू संपत चालली असून, पुढील काही वर्षांत त्याचा पृथ्वीशी असलेला संपर्क कायमचा तुटण्याची शक्यता आहे. मात्र, संपर्क तुटल्यानंतरही मानवाच्या कुतूहलाचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले हे यान अनंत काळ विश्वाच्या प्रवासावर चालतच राहील.